
पुणे/पिंपरी (अधिकार वार्ता प्रतिनिधी): महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि सामाजिक वातावरण जपण्यासाठी अश्लील व विभत्स डीजे डान्सप्रकारांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अभिनेत्री तथा सामाजिक कार्यकर्त्या टीना शर्मा घेवारे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीची दखल घेत पुणे जिल्ह्यात अशा कार्यक्रमांविरोधात होत असलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले आहे. तसेच ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अश्लील नृत्यप्रकारांमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचे सांगत घेवारे यांनी महाराष्ट्र शासन, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे पोलीस आयुक्तालय, गृह विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी निवेदने सादर करून कारवाईची मागणी केली होती. या पाठपुराव्याला आता सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या मोहिमेत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचे सहकार्य मिळाल्याचेही टीना शर्मा घेवारे यांनी सांगितले. कलाकारांच्या वतीने प्रशासनाकडे हा विषय सातत्याने मांडण्यात आला असून, यासंदर्भातील निवेदने व कागदपत्रे उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपण्याची गरज
महाराष्ट्राला संत, समाजसुधारक आणि महापुरुषांची समृद्ध परंपरा लाभली आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांच्या नावाखाली अश्लील किंवा आक्षेपार्ह नृत्यप्रकारांना प्रोत्साहन मिळू नये, अशी भूमिका घेवारे यांनी मांडली. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोजकांबरोबरच संबंधित कलाकारांचीही जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यातील कारवाईचे स्वागत
पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून अशा कार्यक्रमांवर कारवाई होत असल्याचे समाधान व्यक्त करत, याच धर्तीवर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही प्रभावी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कार्यक्रमांना परवानगी देताना नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवा’
“पुणे पोलीस प्रशासन आणि शासनाने आमच्या मागणीची दखल घेत कारवाई सुरू केली आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र ही कारवाई केवळ पुण्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात झाली पाहिजे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अश्लील डीजे डान्सला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी,” असे टीना शर्मा घेवारे यांनी म्हटले.