“आता हे साचलेले पाणी पावसाची चूक की लक्ष न देणाऱ्या लोकप्रतिनिधींची?” देव जाणो !



भोसरी, दिघी (अधिकार वार्ता प्रतिनिधी) :पाऊस पडून आठवडा उलटला तरी दिघीतील मुख्य रस्त्यावरील साचलेले पाणी ओसरण्याचे नाव घेत नाही आहे. भारत माता चौक ते फुगे वस्ती या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना दुर्गंधी आणि आजारांचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही प्रभागातील चार-चार नगरसेवक मात्र या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दिघी येथील भारत माता चौक ते फुगे वस्ती हा रस्ता नागरिकांच्या रोजच्या येण्या-जाण्याचा मुख्य मार्ग आहे. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर या रस्त्याला जणू डबक्याचे स्वरूप आले आहे. आठवडाभर पाणी रस्त्यावरून खाली उतरायला तयार नाही. यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना याच साचलेल्या घाण पाण्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
आजारांना आमंत्रण, परिसरात दुर्गंधी
रस्त्यावर सातत्याने पाणी साचून राहिल्यामुळे संपूर्ण परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला नागरिकांची घरे आहेत. या साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होऊन डेंग्यू, मलेरिया सारख्या गंभीर आजारांना आमंत्रण मिळत आहे. “महापालिका आणि लोकप्रतिनिधी आमच्या आरोग्याशी खेळत आहेत का?” असा संतप्त सवाल येथील रहिवासी विचारत आहेत.
लोकप्रतिनिधींना बॅनरबाजीला वेळ, कामाला नाही!
या प्रभागात तब्बल चार नगरसेवक आहेत. मात्र, एकाही लोकप्रतिनिधीला या रस्त्याची पाहणी करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी वेळ नसणारे हे लोकप्रतिनिधी स्वतःचे फ्लेक्स, बॅनर लावण्यासाठी, बाहेरचे कार्यक्रम गाठण्यासाठी आणि आमदारांच्या भेटीगाठी घेण्यात मात्र व्यस्त असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कार्यक्रमांमध्ये गाणी वाजवून चमकोगिरी करणाऱ्या या लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष जमिनीवर उतरून जनतेचे प्रश्न सोडवण्यात रस नसल्याचे चित्र सध्या दिघीमध्ये पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती पाहता, “आता हे साचलेले पाणी पावसाची चूक की लक्ष न देणाऱ्या लोकप्रतिनिधींची?” असा रोकडा सवाल नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तातडीने या समस्येची दखद घेऊन रस्ता दुरुस्त करावा आणि पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.