मोरवाडीत ८.७८० ग्रॅम एमडी जप्त; तिघांविरोधात गुन्हा

Pranesh

पिंपरी-चिंचवड, (अधिकार वार्ता प्रतिनिधी) दि. १६ सप्टेंबर २०२६ : संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करत ८ ग्रॅम ७८० मिलीग्रॅम एमडी (MD) जप्त केला. अमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने तो बाळगल्याप्रकरणी तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता मोरवाडीतील लाल टोपीनगर परिसरातील कपसे उद्यान गार्डनजवळील सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. अमली पदार्थविरोधी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांवर लक्ष ठेवून ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात तानाजी वेंकटराव कानुरे (वय ४२), ३८ वर्षीय महिला आणि मयुर केशव पाडाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, तानाजी कानुरे आणि संबंधित महिला हे एमडी विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या वाहतूक करून ताब्यात बाळगत असल्याचे समोर आले आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ८.७८० ग्रॅम एमडी, तीन मोबाईल फोन आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ५ लाख ५२ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील अमली पदार्थांच्या विक्रीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसून आले.

दरम्यान, जप्त केलेला एमडी कुठून आणण्यात आला, याबाबत पोलिसांनी तानाजी कानुरे याच्याकडे चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने हा अमली पदार्थ कामशेत येथून मयुर केशव पाडाळे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २२ (ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमडीच्या पुरवठ्याची साखळी, त्यामागील इतर व्यक्ती आणि अमली पदार्थाच्या व्यवहाराबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment