पान टपरीपासून विधानसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंतचा प्रवास; अण्णा बनसोडेंच्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी च्या शासकीय नियामक मंडळावर विश्वस्त पदी नियुक्ती’च्या सत्कार सोहळ्यात जुन्या आठवणींना उजाळा

Pranesh

पिंपरी (अधिकार वार्ता प्रतिनिधी) : पिंपरीचे आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शासकीय नियामक मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पिंपरी येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णा बनसोडे यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाचा उल्लेख करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संजय शिरसाट यांनी आपल्या जुन्या आठवणी सांगताना, ‘मी रिक्षा चालवत होतो. भविष्यात आपण आमदार होऊ, असा स्वप्नातही विचार केला नव्हता. अण्णा, तुम्हीही पानटपरी चालवत होता आणि आज विधानसभेचे उपाध्यक्ष झाला आहात,’ असे सांगितले.

शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे अण्णा बनसोडे यांच्या संघर्षाच्या प्रवासाची आठवण उपस्थितांना झाली. सामान्य परिस्थितीतून पुढे येत राजकारणात आपले स्थान निर्माण करण्याचा बनसोडे यांचा प्रवास यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केला.

आमदार गोपीचंद पडळकर यांनीही अण्णा बनसोडे यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. तर सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करत अण्णा बनसोडे यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या मनोगतातून अण्णा बनसोडे यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा उल्लेख झाला. यावेळी नागरिक व कार्यकर्त्यांनी अण्णा बनसोडे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment