गुटख्याची मोठी खेप महामार्गावरच पकडली; ७९.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pranesh

शिरगाव-परंदवडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गुटखा वाहतूक करणारा टेम्पोचालक अटकेत

पिंपरी-चिंचवड (अधिकार वार्ता प्रतिनिधी): दि. १४ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व सुगंधी तंबाखूची आंतरराज्यीय पातळीवर सुरू असलेली तस्करी उघडकीस आणण्यात शिरगाव-परंदवडी पोलिसांना मोठे यश आले आहे. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत राजनिगंधा गुटखा, तुळशी सुगंधी तंबाखू, वर्मी कंपोस्ट खत आणि अशोक लेलँड टेम्पोसह सुमारे ७९.४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १२ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी सुरू करण्यात आली होती. याचदरम्यान पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारा लाल रंगाचा अशोक लेलँड टेम्पो पोलिसांच्या नजरेस पडला. वाहनाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तत्काळ टेम्पो अडवून तपासणी केली.

चालकाने वाहनात ‘वर्मी कंपोस्ट खत’ असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना संशय आल्याने वाहनाची सखोल झडती घेण्यात आली. त्यावेळी पांढऱ्या पोत्यांमध्ये लपवून ठेवलेले मोठमोठे बॉक्स आढळले. बॉक्स उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला राजनिगंधा गुटखा, तुळशी सुगंधी तंबाखू आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे समोर आले.

या कारवाईत पोलिसांनी अमजदुद्दीन ऐनुलहक चौधरी (रा. माखळी, बंगळुरू, कर्नाटक; मूळ रा. त्रिपुरा) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध शिरगाव-परंदवडी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, १२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त मुद्देमाल

राजनिगंधा गुटखा – ₹42,43,200

सुगंधी तुळशी तंबाखू – ₹14,40,000

वर्ती कंपोस्ट खत – ₹2,63,120

अशोक लेलँड टेम्पो – ₹20,00,000

एकूण – ₹79,46,320

ही कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Comment