
भोसरी: भोसरी-आळंदी रोड येथील बनाचा ओढा परिसर सध्या घाण पाणी, दुर्गंधी आणि अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला असून नागरिकांचे आरोग्य अक्षरशः धोक्यात आले आहे. मुख्य रस्त्यावरच घाण पाण्याचे डबके साचलेले, आजूबाजूला असह्य दुर्गंधी, डासांचे थैमान आणि काही अंतरावरच बाजार… तरीही प्रभाग क्रमांक ५ मधील लोकप्रतिनिधी मात्र नेहमीप्रमाणे “सगळं आलबेल” असल्यासारखे शांत!
धक्कादायक बाब म्हणजे या घाणीच्या बाजूलाच सुपर मार्केट आणि खाद्यपदार्थांची दुकाने सुरू आहेत. नागरिक रोज फळभाज्या, अन्नधान्य आणि खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करत आहेत; पण त्यांच्या नाकात जाणारी दुर्गंधी आणि आरोग्यावर होणारा परिणाम पाहायला ना प्रशासन तयार, ना लोकप्रतिनिधी.
निवडणुकीच्या वेळी “जनतेचे सेवक” म्हणून दारोदारी फिरणारे आता या दुर्गंधीकडे मात्र पाठ फिरवताना दिसत आहेत. की या घाणीची सवयच झाली आहे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. रोगराई पसरण्याची वाट पाहूनच प्रशासन हालचाल करणार का? की एखादा गंभीर प्रकार घडल्यानंतरच फोटोसेशनसाठी नेतेमंडळी मैदानात उतरणार?
बनाचा ओढा परिसरातील ही परिस्थिती म्हणजे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आणि लोकप्रतिनिधींच्या बेफिकीरीचा जिवंत नमुना असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे.