पुणे हादरले! हडपसर, दापोडी आणि फुगेवाडीत विषारी दारूचे तांडव; १७ निष्पाप जीवांचा बळी, संतापलेल्या जनतेचा प्रशासनावर आणि लोकप्रतिनिधींवर घणाघाती वार!

Pranesh

254295

पिंपरी –चिंचवड: हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारू सेवनामुळे १७ निष्पाप नागरिकांचा झालेला दुर्दैवी आणि धक्कादायक मृत्यू ही केवळ एक घटना नसून, संपूर्ण पुणेकरांचे काळीज पिळवटून टाकणारे एक जिवंत हत्याकांड आहे. या थरारक घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरून गेले असून, सर्वसामान्यांच्या घरात आता फक्त आक्रोश आणि शासकीय व्यवस्थेबद्दलचा तीव्र संताप उरला आहे.

घटनेनंतर नेहमीप्रमाणे राजकीय नेते, आमदार, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची पावले दुर्घटनाग्रस्तांच्या घरांकडे वळाली आहेत. सांत्वनपर भेटी आणि मदतीची आश्वासने देऊन प्रसिद्धीचे कॅमेरे चमकवण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र, या दिखाऊ सहानुभूतीमुळे शोककुळ कुटुंबीयांचे अश्रू पुसले जाण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. आज संतप्त नागरिक, महिला आणि तरुणांनी या तथाकथित लोकप्रतिनिधींना आणि पोलिसांना थेट आणि रोकडे सवाल विचारण्यास सुरुवात केली आहे.

भोसरी आणि सांगवी पोलिसांच्या निष्काळजीपणाचा फुटला घडा! दापोडी आणि फुगेवाडी परिसर ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येतो, त्या भोसरी पोलीस स्टेशन आणि सांगवी पोलीस स्टेशनच्या हलगर्जीपणाचा आणि लाजीरवाण्या कारभाराचा पाढाच आता स्थानिक नागरिकांनी वाचला आहे. “या दोन्ही पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आम्ही वारंवार, हात जोडून विनंत्या केल्या, लेखी आणि तोंडी तक्रारी दिल्या. पण या खाकी वर्दीवाल्यांनी आमच्या एकाही तक्रारीची नोंद घेतली नाही. उलट आम्हालाच दमदाटी करून हाकलून लावले,” असा खळबळजनक आणि काळजाला भिडणारा आरोप हंबरडा फोडणाऱ्या महिलांनी केला आहे.

“तेव्हा तुमचे डोळे मिटले होते का?” – जनतेचा संतप्त सवाल”जेव्हा हे विषारी दारूचे काळे धंदे आमच्या छातीवर उघडपणे सुरू होते, तेव्हा हे लोकप्रतिनिधी कुठे झोपले होते आणि भोसरी व सांगवी पोलीस काय करत होते?” असा संतप्त सवाल येथील स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. दुर्घटना घडण्यापूर्वी नागरिकांनी अनेकदा पोलिसांकडे आणि स्थानिक नेत्यांकडे या बेकायदेशीर अड्ड्यांची तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली. आता माणसे दगावल्यानंतर सांत्वन करायला येणाऱ्या नेत्यांच्या या ‘तात्पुरत्या’ भेटी निव्वळ प्रसिद्धीचा स्टंट आहेत, अशी तीव्र भावना जनतेने व्यक्त केली आहे.

१७ मृत्यूंनंतरच पोलिसांचे डोळे उघडले; नागरिकांचा तीव्र नागरिकांनी पोलिसांना उद्देशून अत्यंत कडू आणि तिखट शब्द बोलले. “आमच्या गरिबांच्या तक्रारी पोलिसांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत, कारण त्यांचे कान हप्त्यांच्या पैशांनी बंद झाले असतात. जेव्हा एकाच वेळी १७ गरिबांची प्रेते रस्त्यावर पडली, तेव्हा कुठे या पोलिसांचे डोळे उघडले आणि त्यांना जाग आली. गरिबांचे जीव गेल्याशिवाय कायदा जागा होत नाही का?” असा थेट आणि धारदार सवाल जनतेने उपस्थित केला आहे.

तक्रारींची दखल का घेतली नाही? नेत्यांचे मूक समर्थन होते का? नागरिक वारंवार तक्रार करत असताना भोसरी आणि सांगवी पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष का केले? त्यांना नक्की कोणाचे राजकीय पाठबळ होते? कुणाच्या वरदहस्तामुळे हे विषारी मृत्यूचे पेव शहरात फुटले होते? या प्रश्नांची उत्तरे आता पिंपरी–चिंचवडकर मागत आहेत.

माणसांचे जीव गेल्यानंतर मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या लोकप्रतिनिधींनो आणि खाकी वर्दीची इभ्रत वेशीवर टांगणाऱ्या पोलिसांनो, जनतेचा हा आक्रोश लक्षात ठेवा! जर आता या विषारी अड्ड्यांचे समूळ उच्चाटन झाले नाही, तर हा पेटलेला जनक्षोभ तुमच्या सत्तेच्या आणि खुर्च्यांच्या चिंधड्या उडवल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशारा पिंपरी–चिंचवडकरांनी दिला आहे.

Leave a Comment