‘जनतेच्या पैशावर डोळा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पाठ’ दाखवणाऱ्या अशा लायकी नसलेल्या मंत्र्यांनी…

सोलापूर: शेतकऱ्यांच्या रक्ताचं पाणी करून पिकवलेला ऊस स्वतःच्या उखळ पांढरं करण्यासाठी गिळंकृत करणाऱ्या धोत्री येथील ‘गोकुळ शुगर फॅक्टरी’चा दरोडेखोरपणा आता चव्हाट्यावर आला आहे. ज्या बळीराजाने घाम गाळून या कारखान्याचे धुराडे चालवले, त्याच शेतकऱ्यांचा घामाचा पैसा हा कारखाना मागच्या कित्येक महिन्यांपासून दडपून बसला आहे. आपल्या हक्काच्या पैशासाठी तुळजापूर तालुक्यातील शेतकरी गेल्या १४ दिवसांपासून कारखान्याच्या दारात भीक मागितल्यासारखा आक्रोश करत आहेत, पण या निर्लज्ज व्यवस्थापनाला आणि सत्तेच्या नशेने अंध झालेल्या सरकारला याची साधी चाडही उरलेली नाही.
निसर्गाचा कोप अन् कारखानदारांची क्रूरता; १४ दिवस शेतकरी रस्त्यावर! गेल्या १४ दिवसांत कडाक्याचं ऊन अंगावर झेलत आणि मुसळधार पावसात उघड्यावर भिजत हा शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसला आहे. त्यांना बसण्यासाठी साधी जागा देण्याची सौजन्यशीलताही या क्रूर कारखानदारांनी दाखवलेली नाही. हे शेतकरी ना कोणतं अनुदान मागत आहेत, ना पैशावर व्याज! ते मागत आहेत फक्त त्यांच्या घामाची कमाई! पोराबाळांचं शिक्षण सुटते, घरात चूल पेटवायला पैसा नाही, तरीही हा जगाचा पोशिंदा आज स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी या गोकुळ शुगरच्या दारात रक्ताचे अश्रू ढाळत आहे. कारखान्याने चालवलेली ही लूट म्हणजे शेतकऱ्यांचा जिवंतपणी गळा कापण्याचाच प्रकार आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरेंची लाजीरवाणी पाठ; सत्ताधाऱ्यांची लाळघोटेपणाची परिसीमा! या आंदोलनाला धाराशिव आणि सोलापूरच्या खासदार, आमदारांनी भेटी दिल्या, पण महाराष्ट्रात सत्तेची उब भोगणाऱ्या एकाही सत्ताधारी नेत्याला या शेतकऱ्यांकडे फिरकण्याची लायकी दाखवता आलेली नाही! स्वतःला ‘कामाचा माणूस’ म्हणवून घेणारे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तर या अन्नदात्याकडे साधी नजर फिरवण्याचेही पाप केले नाही. ही त्यांची प्रशासकीय अकार्यक्षमता नसून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा क्रूर दळभद्रीपणा आहे. ‘जनतेच्या पैशावर डोळा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पाठ’ दाखवणाऱ्या अशा लायकी नसलेल्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी तात्काळ आपल्या पदांचे राजीनामे देऊन घरात बसावे, असा उग्र संताप आता जनतेतून व्यक्त होत आहे.
जनतेमध्ये आता उघड चर्चा सुरू आहे की, या दरोडेखोर ‘गोकुळ शुगर’सोबत सत्ताधाऱ्यांचे लागेबांधे आहेत, म्हणूनच हे सरकार शेतकऱ्यांच्या छातीवर पाय देऊन या कारखानदाराला पाठीशी घालत आहे. पण लक्षात ठेवा, शेतकऱ्यांच्या पोराबाळांचे शाप आणि या माऊलींचे अश्रू तुमच्या सत्तेची खुर्ची जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाहीत. जर आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशांची दमडी जमा झाली नाही, तर हा असंतोषाचा वणवा मंत्रालयापर्यंत पोहोचेल, हा शेतकऱ्यांचा थेट आणि आक्रमक इशारा आहे!