लग्नात हजेरी ‘एक नंबर’ अन् डिजिटल फोटोबाजीत सर्वच ‘धन्य’; तुळजापूर पंचायत समिती सदस्यांना गणाचा विसर, जनतेचा सणसणीत टोमणा!

Pranesh

230427

तुळजापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): निवडणुकीत मते मागताना मतदारांच्या पाया पडणारे आणि गणाच्या विकासाची मोठी-मोठी आश्वासने देणारे तुळजापूर पंचायत समितीचेव लोकप्रतिनिधी सध्या नेमके कुठे आहेत? असा संतप्त सवाल आता तालुक्यातील जनता उघडपणे विचारत आहे. “आम्ही तुम्हाला फक्त लग्नाकार्यात अक्षता टाकण्यासाठी आणि बुंदी झोडण्यासाठी निवडून दिले आहे का?” अशा तिखट शब्दांत मतदार आता या सुस्त सदस्यांची लाज काढत आहेत. निवडून आल्यापासून गणाच्या मूलभूत प्रश्नांकडे पूर्णपणे पाठ फिरवून, गणालाच विसरून गेलेल्या या नेत्यांच्या ढोंगी कारभारावर ‘अधिकार वार्ता’ने ओढलेले हे थेट आसूड!

राष्ट्रीय दिनांचे फोटो काढले म्हणजे ‘विकास’ झाला का? १ मे महाराष्ट्र दिन असो, जागतिक मातृदिन असो की नर्स दिन—या डिजिटल पुढाऱ्यांची सकाळ फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर सुटाबुटातील फोटोंसह सुरू होते. महापुरुष आणि राष्ट्रीय कार्यक्रमांचे केवळ फोटो काढायचे, ते सोशल मीडियावर पोस्ट करायचे आणि स्वतःची पाठ स्वतःच थपटून घ्यायची, हाच काय तो यांचा ‘विकास’! कदाचित या फोटोबहाद्दर सदस्यांना असे वाटत असावे की, अशा पोस्ट टाकल्याने गणातील रस्त्यांचे खड्डे बुजतात आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो! जनतेला कामाचा माणूस हवा आहे, रोज सकाळ-संध्याकाळ स्टेटस बदलणारा ‘सोशल मीडिया मॉडेल’ नव्हे, हा टोमणा आता गल्लीबोळात मारला जात आहे.

आश्वासनांची गाजरे ठरली ‘खोटी शब्दरचना’! “आधी विजयी करा, मग विकासाचा महापूर आणू”, अशी स्वप्ने दाखवून मतदारांना भुरळ पाडणारे हे सदस्य आता तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. आज मागे वळून पाहताना मतदारांना जाणीव होत आहे की, ती आश्वासने म्हणजे केवळ खुर्ची मिळवण्यासाठी रचलेली एक ‘खोटी शब्दरचना’ होती. “आधी निवडून येऊ, मग स्वतःचा विकास करू आणि लोकांच्या विकासाचा नंतर विचार करू”, हीच या सदस्यांची खरी मानसिकता होती, असे म्हणणे आता अजिबात चुकीचे ठरणार नाही.

लोकांच्या समस्यांचा विकास ‘शून्य’, लग्नाच्या पंगतीत मात्र ‘एक नंबर’! गावागावांत पाण्याचे टँकर सुरू नाहीत, गटारी तुंबल्या आहेत, आरोग्याची वाट लागली आहे. या खऱ्या लोकांच्या समस्यांचा विकास मात्र पूर्णपणे दुर्लक्षित आहे. या गंभीर प्रश्नांवर अधिकारBox समोर आवाज उठवायला या सदस्यांना वेळ नाही. मात्र, तालुक्यात कुठेही लग्न, मुंज किंवा साखरपुडा असू द्या, तिथे फेटा बांधून आणि हार-तुरे घेऊन हजेरी लावण्यात हे सदस्य नेहमी ‘एक नंबर’ असतात. गावाला पाण्याची गरज असताना ज्यांचे फोन ‘नॉट रीचेबल’ येतात, तेच लोकप्रतिनिधी लग्नाच्या पंक्तीत फोटो काढायला सर्वात पुढे कसे, असा जळजळीत प्रश्न सुज्ञ नागरिक विचारत आहेत.

तुळजापूर पंचायत समितीच्या या सुस्त आणि केवळ ‘दिखाव्यापुरत्या’ मर्यादित राहिलेल्या सदस्यांना या टोमण्यांमुळे तरी जाग येणार का? की पुढील निवडणुका येईपर्यंत केवळ लग्नाच्या पंगती आणि सोशल मीडियाचे स्टेटस सांभाळण्यातच आपली पाच वर्षे वाया घालवणार? याकडे आता संपूर्ण तुळजापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment