“निवडून आले की सत्तेची मस्ती, जनतेला मात्र नरकयातनांची सुस्ती! गव्हाणे वस्तीत हाय-व्होल्टेज इलेक्ट्रिक डेपो शेजारीच गटारीचे पाणी; नगरसेवक की नुसतेच पांढरे हत्ती?”

Pranesh

भोसरी : निवडणुका आल्या की लाळ घोटत, हात जोडत गल्लीबोळात फिरणाऱ्या आणि विकासाच्या नावाखाली स्वतःची घरे भरणार्‍या प्रभाग ७ मधील त्या ‘लाचार’ नगरसेवकांना आता गव्हाणे वस्तीतील नागरिकांचा हा जीवघेणा नरक का दिसत नाहीये? जनतेच्या मतांवर निवडून आलेले हे पुढारी नेमके कोणत्या बिळात जाऊन लपलेत? ते लोकांची कामे करायला लोकप्रतिनिधी झालेत की फक्त सत्तेची ऊब घेऊन स्वतःची चरबी वाढवायला? असा थेट, जळजळीत आणि धारदार सवाल आता गव्हाणे वस्तीतील संतप्त जनता जाहीरपणे विचारत आहे.

प्रभाग ७ मधील गव्हाणे वस्ती येथील कर संकलन विभागाच्या अगदी समोरच चेंबरमधून घाण पाणी उसळून थेट मुख्य रस्त्यावर येत आहे. महापालिकेच्या नाकाखाली हा गलिच्छ कारभार रोज सुरू आहे. पण डोळ्यांवर कातडे पाडलेल्या या भागातील लोकप्रतिनिधींना आणि महापालिकेच्या लाचखोर अधिकाऱ्यांना याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे.

हाय-व्होल्टेज इलेक्ट्रिक डेपो शेजारीच मृत्यूचा सापळा! अतिशय धक्कादायक आणि गंभीर बाब म्हणजे, ज्या ठिकाणाहून हे गटारीचे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे, त्याला अगदी लागूनच महावितरणचा मोठा इलेक्ट्रिक डेपो (विद्युत डेपो) आहे, जिथून संपूर्ण भागाला हाय-व्होल्टेज विजेचा पुरवठा केला जातो. या डेपोच्या अवघ्या दोन मीटर अंतरावर मुख्य रस्ता आहे. याच रस्त्यावरून दिवस-रात्र रिक्षा, पीएमटी (PMT) बसेस आणि हजारो वाहनांची, नागरिकांची ये-जा सुरू असते.

रस्त्यावर उघड्या गटारी, साचलेला कचरा, वाढलेले गवत आणि त्यातच वाहणारे हे पाणी थेट त्या विद्युत डेपोच्या परिसरात पसरत आहे. उद्या जर या हाय-व्होल्टेज इलेक्ट्रिक डेपोमधून किंवा करंट वाहून नेणाऱ्या यंत्रणेतून या पाण्यात करंट उतरला, तर होणाऱ्या भीषण अनर्थाला आणि शेकडो नागरिकांच्या जीवितहानीला जबाबदार कोण? महापालिका की एसी केबिनमध्ये बसून सत्तेची मजा घेणारे प्रभाग ७ मधील पांढरे हत्ती?

९५% नालेसफाई झाली तर मग हे पाणी तुमच्या बापाचे आहे का? पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘१ जूनपर्यंत ९५% नालेसफाई पूर्ण झाली आहे’ असा छातीठोक आणि बोगस दावा केला होता. जर ९५% नालेसफाई झाली आहे, तर मग गव्हाणे वस्तीत रोज हे घाण पाणी रस्त्यावर का उसळत आहे? पालिकेचा हा दावा निव्वळ कागदोपत्री आणि मलिदा खाण्यासाठी होता हे आता उघड झाले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या या खोट्या दाव्यावर आणि ढिसाळ कामावर प्रभाग ७ मधील एकाही नगरसेवकाने अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची औकात दाखवलेली नाही. जनतेच्या पैशांवर पगार घेणारे अधिकारी आणि मते घेऊन गब्बर झालेले नगरसेवक दोघेही एकमेकांची पाठ राखण्यात मग्न आहेत.

निवडणुकीपुरतीच लाळ घोटणारे पुढारी आता सुस्त! “निवडणुका आल्या की हेच नगरसेवक गल्लीबोळात फिरून विकासाच्या गप्पा मारतात. आम्ही हे करू, ते करू अशी आश्वासने देतात. पण निवडून आले की जनतेला वाऱ्यावर सोडून देतात. स्वतःच्या महागड्या आणि एसी गाड्यांची काच वर करून फिरणाऱ्या या पुढाऱ्यांना रस्त्यावरून चालणाऱ्या सामान्य जनतेचे हाल दिसत नाहीत,” अशा शब्दांत स्थानिक नागरिकांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Leave a Comment