पुण्यात पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सेंट्रो कारसह तब्बल ५.२३ लाखांची अवैध हातभट्टी दारू जप्त! एकाला बेड्या

Pranesh

251047

(अधिकार वार्ता प्रतिनिधी) पुणे: शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काळेपडळ पोलिसांनी एक मोठी आणि यशस्वी मोहीम फत्ते केली आहे. हांडेवाडी रोडवरील सातवनगर भागात झाडाझुडपांच्या आडोश्याला आणि एका सेंट्रो कारमध्ये लपवून ठेवलेला तब्बल २४५० लिटर बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या धडक कारवाईत एकूण ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका ५० वर्षीय बुकीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

गुपिते उघड आणि पोलिसांचा छापाकाळेपडळ पोलीस ठाण्याचे तपास पथक २४ मे रोजी परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी गस्त घालत होते. यादरम्यान, पोलीस अंमलदार नितीन ढोले आणि गिरीराज जगदाळे यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून अत्यंत गोपनीय आणि खात्रीशीर माहिती मिळाली. सातवनगर येथील गणपती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका मोकळ्या मैदानामध्ये, एक इसम स्वतःच्या चारचाकी गाडीत बेकायदेशीर गावठी दारू साठवून तिची गुपचूप विक्री करत असल्याची ती माहिती होती.

मिळालेल्या माहितीचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना याची कल्पना दिली. वरिष्ठांच्या आदेशानुसार, पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी वेगाने सापळा रचला आणि अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान संशयित आरोपी सुनील हरी कचरावत (वय ५०, रा. सातवनगर, हांडेवाडी रोड, पुणे) याला पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले.

मुद्देमालाचा मोठा साठा हस्तगतपोलिसांनी जेव्हा परिसराची कसून झडती घेतली, तेव्हा त्यांना झाडाझुडपांमध्ये लपवलेले आणि सेंट्रो कार (क्रमांक: MH 12 DS 4080) मध्ये भरलेले ७० प्लास्टिकचे ड्रम आढळून आले. या ड्रममध्ये एकूण २४५० लिटर विषारी हातभट्टी दारू साठवण्यात आली होती. पोलिसांनी दारूच्या साठ्यासह वाहतुकीसाठी वापरली जाणारी कार असा एकूण ५ लाख २३ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

कडक कायदेशीर पाऊलयाप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) आणि (ड) अंतर्गत गुन्हा (रजिस्टर क्रमांक २३८/२०२६) दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का, याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत.

या’ जाबांज पथकाने केली कामगिरीही धडक कारवाई परिमंडळ ५ चे पोलीस उपआयुक्त जीवन बेनीवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या थेट सूचनेनुसार करण्यात आली. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहीद शेख तसेच पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगदाळे या संपूर्ण पथकाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पोलिसांच्या या धडाक्यामुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Comment