दिघी प्रभाग क्रमांक ४ मध्ये कचऱ्याचे साम्राज्य; प्रशासनाची निष्क्रियता आणि नागरिकांची बेफिकिरी दोन्ही कारणीभूत!

Pranesh

निवडणुकीत विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करणारे लोकप्रतिनिधी आज नेमके कुठे गायब झाले आहेत?

(अधिकार वार्ता प्रतिनिधी) भोसरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या दिघी प्रभाग क्रमांक ४ मधील भारत माता चौक ते फुगेवस्ती या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचा अक्षरशः ओढा निर्माण झाला असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यालगत साचलेला कचरा, प्लास्टिकचे ढिगारे आणि मलबा यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र याकडे संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

परिस्थिती इतकी गंभीर आहे की मुक्या जनावरांनाही कचऱ्यात अन्न शोधावे लागत आहे. याच रस्त्याने दररोज शेकडो विद्यार्थी, महिला आणि नागरिक ये-जा करतात. डास, माश्या आणि घाणीमुळे रोगराईचे संकट उभे राहिले असताना प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे या समस्येला केवळ प्रशासनच नव्हे तर काही बेजबाबदार नागरिकही तितकेच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. परिसरात आधीच मोठ्या प्रमाणात घाण आणि दुर्गंधी असल्याने अनेकजण सर्रास तिथेच कचरा टाकत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस कचऱ्याचा ढिगारा वाढत चालला आहे.

दरम्यान, याच मार्गावरून शेकडो विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांची रोजची ये-जा असते. डास, माश्या आणि अस्वच्छतेमुळे रोगराईचा धोका वाढत असताना प्रभागातील चार-चार लोकप्रतिनिधींना ही परिस्थिती दिसत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

स्वच्छ शहराच्या घोषणा फक्त कागदावरच आहेत का? नागरिकांनी जबाबदारी घ्यावीच, पण करदात्यांच्या पैशावर चालणाऱ्या प्रशासनानेही आपले कर्तव्य पार पाडणार की नाही? असा संतप्त सवाल आता दिघीकर नागरिक उपस्थित करत आहेत.

Leave a Comment