दिघी-भोसरी रस्त्यावर भ्रष्टाचाराचा अथांग महासागर; प्रभाग ५ मधील निकृष्ट कामाविरोधात नगरसेविका भिमाताई फुगे यांचे जाहीर आंदोलन, भाजपच्या सत्ताधाऱ्यांचे खिसे भरल्याचा गंभीर आरोप!

Pranesh

(अधिकार वार्ता प्रतिनिधी) भोसरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या आळसामुळे आणि कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे प्रभाग क्रमांक ५ मधील दिघी-भोसरी रस्ता नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. १२ महिने आणि २४ तास या रस्त्यावर कोणत्या ना कोणत्या कामाचे उत्खनन सुरूच असते. कधी ड्रेनेज लाईन फुटते, कधी केबल टाकली जाते, तर कधी बुजवलेला रस्ता पुन्हा उकरला जातो. ‘कामाचा अथांग महासागर’ बनलेल्या या रस्त्यावरील निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात आणि प्रशासनाच्या ढिम्म कारभाराविरोधात प्रभाग ५ च्या एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका भिमाताई फुगे यांनी काल रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. याच प्रभागात भाजपचे तीन-तीन नगरसेवक असतानाही त्यांनी या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

सिमेंटच्या रस्त्यावर अवघ्या १० दिवसांत खड्डे; ३ भाजप नगरसेवक झोपेत! दिघी-भोसरी रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला. मात्र, हा रस्ता इतक्या निकृष्ट दर्जाचा आहे की अवघ्या १० दिवसांतच त्यावर खडी आणि खड्डे दिसू लागले आहेत. उन्हाळा, पावसाळा की हिवाळा, या रस्त्याचे काम कधीच संपत नाही. एकदा रस्ता केला की तो पुन्हा केबल टाकण्यासाठी उकरला जातो. या सातत्यपूर्ण खोदकामामुळे आणि निकृष्ट दर्जामुळे येथे वारंवार भीषण अपघात होत आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रभागातील भाजपचे तीन नगरसेवक आणि महापालिकेतील सत्ताधारी वर्ग कुंभकर्णी झोपेत डुलक्या घेत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनादरम्यान व्यक्त करण्यात आली.

सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या पैशातून स्वतःचे खिसे भरले: भिमाताई फुगे! आंदोलनाचे नेतृत्व करताना नगरसेविका भिमाताई फुगे यांनी कंत्राटदार, अधिकारी आणि सत्ताधारी भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे थेट आणि गंभीर आरोप केले. कामाच्या दर्जाबद्दल विचारणा केली असता, “सिमेंट नाही, वाळू महाग आहे, खडी मिळत नाही, संप सुरू आहे,” अशी उडवाउडवीची आणि बेजबाबदार उत्तरे सत्ताधारी भाजप नेत्यांकडून दिली जातात. यावर कडाडून टीका करताना भिमाताई फुगे म्हणाल्या, “जर साहित्याचा तुटवडा होता आणि संप होता, तर कामाची मंजुरी कशाला घेतली? आधी जनतेच्या पैशाने स्वतःचे खिसे भरायचे आणि नंतर संपाचे कारण पुढे करायचे, हा सत्ताधाऱ्यांचा ढोंगीपणा आता खपवून घेतला जाणार नाही.”

पाणी टंचाईत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय; ठेकेदाराला माताराणी कन्ट्रक्शन दंड कधी? या वेळी सम्राट फुगे व सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरात पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने महापौरांनी सध्या वॉशिंग सेंटर आणि स्विमिंग पूल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना या रस्त्याचे काम सुरू असताना दर दोन दिवसाला मुख्य जलवाहिनी (पाईपलाईन) फुटते आणि हजारो लिटर पाणी वाया जाते. या निष्काळजीपणाबद्दल संबंधित ‘माताराणी कन्स्ट्रक्शन’ कंपनीला प्रशासनाने आतापर्यंत किती रुपयांचा दंड ठोठावला, याचे उत्तर अधिकाऱ्यांनी जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

नागरिक आणि व्यापाऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबाया आक्रमक आंदोलनात नगरसेविका भीमाताई फुगे यांच्यासोबत नगरसेवक विराज लांडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल गवळी, अमर फुगे आणि स्थानिक ट्रस्टचे सर्व दुकानदार तसेच शेकडो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रभाग ५ मध्ये तीन भाजपचे सत्ताधारी नगरसेवक असतानाही विकासकामांचा बोजवारा उडाला असून, नागरिकांना केवळ त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा सूर यावेळी उमटला. प्रशासनाने तात्काळ दर्जेदार रस्ता करून न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

Leave a Comment