७७२ पदे, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि पायाभूत सुविधांना मंजुरी; आणखी ४०० खाटांसाठीही पाठपुरावा

(अधिकार वार्ता प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड: जिल्हा रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा रुग्णालयात २०० खाटांचे अत्याधुनिक सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाने ८ सप्टेंबर रोजी मंजुरी दिली आहे.
या रुग्णालयासाठी ७७२ पदांची निर्मिती, अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री, पायाभूत सुविधा आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हृदयरोग, कर्करोग, मेंदू व मज्जासंस्थेचे आजार, मूत्रपिंडविकार यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचार जिल्ह्यातच उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
जिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या आणखी वाढविण्याची गरज लक्षात घेऊन ४०० अतिरिक्त खाटांसाठीही आमदार शंकर जगताप यांचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णालयाची क्षमता आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, राज्यात २०२६ ते २०३१ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रगती’ आरोग्य सुधारणा प्रकल्पाला ४ हजार २५० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्हा रुग्णालयांना आधुनिक यंत्रसामग्री, डिजिटल सुविधा आणि दर्जेदार उपचार व्यवस्थेने सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.
“२०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाला मिळालेली मंजुरी हा सर्वसामान्य रुग्णांसाठी मोठा दिलासादायक निर्णय आहे. गंभीर आजारांवरील दर्जेदार उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आणखी ४०० खाटांसाठीही प्रयत्न सुरू असून, जिल्हा रुग्णालय अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी पुढेही प्रयत्नशील राहू,” असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.