आरोपपत्रासाठी ‘मदती’चा सौदा; लाच स्वीकारताच…

(अधिकार वार्ता प्रतिनिधी) लोणी काळभोर, पुणे : गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरच लाच स्वीकारल्याप्रकरणी ACB ने कारवाई केल्याने लोणी काळभोरसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांना लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई केली आहे.
आरोपपत्र दाखल करण्यासाठी ‘मदती’चा सौदा?
प्राथमिक माहितीनुसार, एका गुन्ह्यातील आरोपीचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यासह प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात API कृष्णा बाबर यांनी आरोपीच्या नातेवाईकाकडे लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. या मागणीबाबत तक्रारदाराने थेट ACB पुणेकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याने ACB ने कारवाईची आखणी केली.
सापळा रचला अन् पोलिस अधिकाऱ्यावरच झडप!
ठरल्याप्रमाणे तक्रारदार लाचेची रक्कम देण्यासाठी गेला. रक्कम स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होताच आधीपासून दबा धरून बसलेल्या ACB च्या पथकाने कारवाई करत API कृष्णा बाबर यांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यावरच लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली कारवाई झाल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
खाकीची ताकद कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आहे; मात्र त्याच खाकीवर लाचेचा आरोप झाल्यानंतर ACB ने केलेली ही कारवाई पोलिस यंत्रणेसाठी निश्चितच धक्कादायक मानली जात आहे. या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास ACB कडून सुरू आहे.