पिंपरी-चिंचवड प्रभागाचा बोजवारा !

Pranesh

ड्रेनेज, रस्ते, पाणी प्रश्नांवर माजी नगरसेवक अपयशी – नागरिकांचा संताप अनावर.

39687 2

२७ डिसेंबर २०२५

पिंपरी-चिंचवड |अधिकार वार्ता प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या एका प्रभागात ड्रेनेजची दुरवस्था, रस्त्यांची चाळण, अपुरा पाणीपुरवठा आणि सर्वत्र पसरलेली घाण यामुळे नागरिकांचे जगणे अक्षरशः नरकयातनेत बदलले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गंभीर समस्यांवर माजी नगरसेवकांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात ठोस कामच केले नसल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे.प्रभागातील ड्रेनेज लाईन वारंवार तुंबते, सांडपाणी रस्त्यावरून वाहते, दुर्गंधीमुळे नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागत आहे. तरीही माजी नगरसेवकांनी याकडे डोळेझाक केल्याची तीव्र टीका स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

38977 1

रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की, खड्ड्यांमधून रस्ता शोधावा लागतो, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. “विकास निधी नेमका कुठे गेला? रस्त्यांवर नाही, हे मात्र नक्की,” असा सवाल उपस्थित केला जात आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, आठवड्यातून मोजक्याच दिवस पाणी येते. या प्रश्नावर माजी नगरसेवकांनी केवळ पाहणी आणि घोषणांपुरतेच काम केले, प्रत्यक्ष उपाययोजना मात्र कधीच झाल्या नाहीत, असा आरोप आहे.घाणेरडे रस्ते, कचऱ्याचे ढीग आणि डासांचा उपद्रव वाढत असताना आरोग्याच्या प्रश्नांकडेही माजी नगरसेवकांनी साफ दुर्लक्ष केल्याचे नागरिक सांगतात.

“निवडणुकीच्या वेळी प्रभाग आठवतो, नंतर मात्र नागरिक विसरले जातात,” अशी जहरी टीका ऐकायला मिळत आहे.या सर्व प्रकारामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, माजी नगरसेवकांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येणाऱ्या काळात या निष्क्रिय कारभाराचा जाब नागरिक नक्कीच विचारतील, असा इशारा दिला जात आहे.

Leave a Comment