जनतेच्या प्रश्नांवर ‘माजी’ गप्प आणि ‘भावी’ फक्त स्वप्नांच्या जगात; प्रभाग ४ मधील मतदारांचा संताप!

दिघी-बोपकेल (अधिकार वार्ता प्रतिनिधी): प्रभाग क्रमांक ४ (दिघी-बोपकेल) मध्ये सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे पाच वर्षे सत्तेत राहूनही कचरा, पाणी आणि रस्त्यांचे प्रश्न सोडवू न शकलेले ‘माजी’ नगरसेवक पुन्हा एकदा जनसंपर्काचा बनाव करत आहेत, तर दुसरीकडे ‘आम्ही परिवर्तन घडवू’ असे म्हणणारे ‘भावी’ उमेदवार केवळ सोशल मीडियावर चमकोगिरी करण्यात मग्न आहेत. या दोघांच्या श्रेयवादाच्या लढाईत सामान्य नागरिकांचा मात्र बळी जात आहे.

माजी नगरसेवकांचे ‘पाच वर्षांचे अपयश’
पाच वर्षे सत्तेची उब भोगणाऱ्या माजी नगरसेवकांनी प्रभागासाठी नेमके काय केले? बोपकेलचा पुलाचा प्रश्न असो किंवा दिघीतील अंतर्गत रस्त्यांची चाळण, हे प्रश्न सोडवण्याऐवजी केवळ नारळ फोडण्यात आणि उद्घाटनं करण्यातच वेळ घालवला गेल्याची टीका नागरिक करत आहेत. पाच वर्षात ज्यांना प्रभागातील ड्रेनेज लाईन आणि पाण्याचा प्रश्न मिटवता आला नाही, ते आता कोणत्या तोंडाने पुन्हा मते मागायला येत आहेत? असा रोकडा सवाल जनता विचारत आहे.
भावी उमेदवारांची ‘फेसबुक- इंस्टाग्राम विकासाची’ घोडदौड: दुसरीकडे, निवडणुका जवळ आल्याचे पाहून गल्लीबोळात ‘भावी’ नगरसेवकांचे पेव फुटले आहे. वाढदिवसाचे बॅनर लावणे आणि समाजमाध्यमांवर स्वतःचा उदो-उदो करणे यापलीकडे या भावी नगरसेवकांचे कर्तृत्व काय? जनतेच्या सुख-दुःखात कधीही न दिसणारे हे चेहरे आता अचानक ‘समाजसेवक’ म्हणून वावरू लागले आहेत. विरोधकाची भूमिका बजावताना देखील हे भावी उमेदवार केवळ पोकळ घोषणाबाजी करत असून, त्यांच्याकडे प्रभागाच्या विकासाचा कोणताही ठोस ‘रोडमॅप’ नाही.
समस्यांचे डोंगर कायम:
पाणी टंचाई: टँकर लॉबीशी असलेल्या हितसंबंधांमुळे पाणीपुरवठा मुद्दाम विस्कळीत केला जातोय का? असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
वाहतूक कोंडी: मॅगझीन चौक ते दिघी गावठाणापर्यंत होणारी कोंडी सोडवण्यासाठी दोघांकडेही उपाययोजना नाहीत.
नागरिक आता सुज्ञ झाले आहेत. “माजींनी आम्हाला पाच वर्षे फसवलं आणि भावी लोक आता फसवण्याची तयारी करत आहेत,” अशी भावना येथील रहिवाशांची झाली आहे. केवळ चमकणारे बॅनर आणि आश्वासनांची खैरात करणाऱ्या या दोन्ही गटांना आगामी निवडणुकीत प्रभाग ४ मधील जनता घरचा रस्ता दाखवणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.