
धाराशिव (अधिकार वार्ता प्रतिनिधी):तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी पंचायत समिती गटात राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून पद्माकर पाटील हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. ‘आदर्श सरपंच’ म्हणून ओळख असलेले पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या संपूर्ण मतदारसंघात वाऱ्यासारखी पसरली असून, कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी कंबर कसली आहे.
जनसंपर्काचा ‘पाटील’ पॅटर्न! पद्माकर पाटील यांचा खुदावाडी गटात दांडगा जनसंपर्क असून सर्वसामान्यांचे नेते म्हणून त्यांची मोठी प्रतिमा आहे. येडोळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असताना त्यांनी केलेल्या विकासकामांचा डोंगर त्यांच्या पाठीशी आहे.
विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच वेळी १०१ घरांचे बांधकाम पूर्ण करून त्यांनी प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्यांना राज्यात द्वितीय क्रमांकाचा ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार मिळाला असून, त्यांच्या कामाची पावती आता निवडणुकीत मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निष्ठावान कार्यकर्त्याची ‘ठाम’ मागणी पद्माकर पाटील हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते मानले जातात. पक्षवाढीसाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट नाळ जोडली आहे. म्हणूनच, “पक्षनिष्ठेला न्याय मिळावा आणि खुदावाडीचा विकास व्हावा,” यासाठी पद्माकर पाटील यांनाच उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.
“संधीचं सोनं करणार!” – पद्माकर पाटील आपल्या उमेदवारीबाबत आत्मविश्वासाने बोलताना पद्माकर पाटील म्हणाले की, “पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून संधी दिली, तर त्या संधीचं सोनं करून दाखवेन. शेतकरी, कष्टकरी, महिला आणि तरुणांच्या प्रश्नांची मला जाण आहे. त्यांच्या हक्कासाठी आणि खुदावाडी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी मी शेवटपर्यंत लढत राहीन.
निवडणूक होणार चुरशीची! पद्माकर पाटील यांच्यासारखा अभ्यासू आणि लोकसंग्रह असलेला चेहरा रिंगणात उतरल्यास खुदावाडी गटातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकणार असून, ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची होणार, हे मात्र निश्चित!