शहापूर गटात ‘आयाराम’मुळे संतापाची लाट; ‘आमचा माणूस’ कचरू सगट यांच्याच पाठीशी मतदार ठाम! धगधगती मशालच भगवा फडकावणार?

Pranesh

शहापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): शहापूर गटामध्ये सध्या राजकीय वातावरण तापले असून ‘आयाराम-गयाराम’ राजकारणामुळे मतदारांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. निवडणूक जवळ येत असतानाच बाहेरून आयात उमेदवार आणण्याच्या प्रकारामुळे गावोगाव चर्चा रंगू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर समाजातील वरिष्ठ नागरिक व निवडणूक अभ्यासकांनी थेट दावा केला आहे की, “या वेळी शहापूर गटात धगधगती मशालच भगवा पसरवणार आहे. कारण भाजपा, शिवसेना पक्ष आमचा आहे पण त्या पक्षाचा उमेदवार मात्र आमचा स्थानिक नाही”.

गटातील मतदारांमध्ये एकच सूर ऐकू येतोय –“आमचा गट, आमचं गाव आणि आमचा माणूस!” या घोषवाक्याने संपूर्ण शहापूर गटात वातावरण भारलेले आहे. कचरू सगट हे नाव आज शहापूर गटामध्ये विश्वासाचं प्रतीक बनलं आहे. लहानपणापासून समाजकार्य, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणं, गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून जाणं, सर्व समाजाच्या सण-उत्सवांमध्ये सक्रिय सहभाग – या सगळ्या गोष्टींमुळे कचरू सगट हे केवळ उमेदवार नसून लोकांचा माणूस बनले आहेत.

दुसरीकडे, सुनील बनसोडे हे नाव मात्र या निवडणुकीपुरतंच गटात झळकलं असल्याची तीव्र भावना मतदारांमध्ये आहे. “हे आधी कुठे होते?”, “आमच्या प्रश्नांवेळी दिसले नाहीत”, “फक्त निवडणूक आली की बाहेरचे येतात” – अशा संतप्त प्रतिक्रिया गावागावात ऐकायला मिळत आहेत. मतदार संघामध्ये खुलेआम चर्चा आहे –”आम्ही बाहेरून आलेल्याला मतदान का द्यायचं? आम्ही कचरूला पाहिलंय, अनुभवलेलं आहे, म्हणून त्यालाच मत देणार!”

या निवडणुकीत जर मतदार शांत बसले, तर पुढील प्रत्येक निवडणुकीत बाहेरून आयात उमेदवार गटावर लादले जातील, अशी भीतीही लोक व्यक्त करत आहेत. त्यामुळे यावेळी मतदारांनी ठरवलं आहे –”आता नाही सहन करायचं आयाराम राजकारण!”

शहापूर गटामध्ये सध्या जी स्थिती आहे, ती केवळ निवडणूक लढतीपुरती मर्यादित नाही, तर ती स्वाभिमानाची लढाई बनली आहे. स्थानिक नेतृत्व की बाहेरची आयात? गावचा माणूस की पक्षाचा प्रयोग? हा प्रश्न आता प्रत्येक घरात चर्चेचा विषय बनला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, यावेळी शहापूर गटात पारंपरिक समीकरणे मोडीत निघण्याची दाट शक्यता असून, लोकांच्या भावनांवर उभा असलेला उमेदवारच बाजी मारणार आहे. आणि ही भावना स्पष्टपणे कचरू सगट यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर, शहापूर गटात सध्या एकच नारा घुमतोय –“बाहेरच्यांना नाही, आमच्या माणसालाच!”आणि हाच नारा यावेळी निवडणुकीचा निकाल ठरवणार, यात शंका नाही.

Leave a Comment