ज्यांना साधी गटारं साफ करता आली नाहीत, ते आता ‘पंचायत समिती’साठी मतदारांपुढे ‘तोंड वर’ करून उभे!

Pranesh

76186

होर्टी (अधिकार वार्ता प्रतिनिधी): पंचायत समिती निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, यावेळची निवडणूक केवळ आश्वासनं आणि सभांपुरती मर्यादित नसून, गावातील प्रलंबित समस्यांवरून उमेदवारांना चांगलेच धारेवर धरले जात आहे. विशेषतः होर्टी पंचायत समिती गणात स्थानिक लोकांकडून’ अशा लोकांवर सडकून टीका केली जात आहे, ज्यांनी पद असताना किंवा कार्यकर्ता म्हणून साध्या मुलभूत सुविधांकडेही लक्ष दिले नाही.

स्थानिक नागरिकांचा असा आरोप आहे की, ज्यांना आजपर्यंत गावातली गटारे नीट स्वच्छ करून घेता आली नाहीत, ज्यांनी कधी गावात अंधार असताना किंवा वारंवार वीज जात असताना स्वतःहून पुढाकार घेऊन महावितरणशी संपर्क साधला नाही, असे लोक आज विकासाच्या गप्पा मारत पंचायत समिती सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. “लाईट गेली तर कधी डीपीपाशी फिरकले नाहीत आणि आता मते मागायला दारात येत आहेत,” अशी संतप्त भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

टीकेची धार आता ‘या’ मुद्द्यांकडेही वळली: केवळ गटार आणि वीजच नाही, तर नागरिकांनी आता टीकेसाठी अनेक नवीन मुद्दे शोधले आहेत: पाण्याच्या टाक्यांची दुरवस्था: गावात ‘हर घर जल’ योजनेच्या गप्पा मारल्या जातात, पण प्रत्यक्षात जुन्या जलवाहिन्या फुटलेल्या आहेत. ज्यांनी कधी गळती काढायला मिस्त्री लावला नाही, त्यांना सत्तेची स्वप्ने कशी पडतात? असा सवाल विचारला जात आहे.

शाळेची गळकी छते आणि अंगणवाडी: गावातील अंगणवाडीत किंवा शाळेत पावसाळ्यात पाणी गळते, तेव्हा हे उमेदवार कुठे होते? मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी साधी पत्रे बदलण्यासाठी ज्यांनी पाठपुरावा केला नाही, त्यांनी तालुक्याच्या विकासाच्या गप्पा मारणे हास्यास्पद आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि धुळीचे साम्राज्य: मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळातील रस्त्यांची चाळण झाली आहे. चिखलातून चालताना ग्रामस्थांचे हाल होतात, तेव्हा हे ‘भावी सदस्य’ कुठे गायब असतात? असा थेट प्रश्न आता विचारला जात आहे. आरोग्य केंद्रातील गैरसोय: प्राथमिक आरोग्य केंद्रात कधी औषधं नसतात तर कधी डॉक्टर. सामान्य माणूस आजारी पडला की पदरमोड करून शहरात जातो, तेव्हा या नेत्यांनी कधी जिल्हा परिषदेकडे तक्रार का केली नाही?

उमेदवारांची पळापळग्रामस्थांच्या या ‘प्रश्नांच्या पावसा’मुळे प्रचाराला निघालेल्या उमेदवारांना आता उत्तरे देणे कठीण झाले आहे. कार्यकर्त्यांच्या गर्दीत राहून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करणारे उमेदवार आता मतदारांच्या रोषाला बळी पडत आहेत. “आम्ही आता आश्वासनं नाही, तर तुमच्या कामाचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ बघूनच मतदान करणार,” असा पवित्रा होर्टी गणातील जनतेने घेतला आहे.

Leave a Comment