


हंगरगा (नळ) (अधिकार वार्ता प्रतिनिधी) : जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या प्रचाराचा धुरळा उडत असतानाच, हंगरगा नळ गावात सामाजिक एकोप्याचे एक प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. काँग्रेस उमेदवार प्रतिक्षा सुरवसे यांचे पती आणि समाजसेवक गोपाळ सुरवसे यांनी आज राजकारणापेक्षा माणुसकी आणि सर्वधर्म समभाव मोठा असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले.
आज शुक्रवार असल्याने हंगरगा नळ येथील मुस्लीम बांधव नमाजसाठी मशिदीमध्ये गेले होते. प्रचाराच्या निमित्ताने लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी निघालेल्या गोपाळ सुरवसे यांनी वेळेचे कोणतेही बंधन न पाळता, नमाज पूर्ण होईपर्यंत अत्यंत संयमाने मशिदीबाहेर थांबणे पसंत केले. नमाज संपल्यानंतर बाहेर आलेल्या प्रत्येक मुस्लीम बांधवाची त्यांनी आस्थेने विचारपूस केली आणि त्यांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या.
फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा जागर: “मनामध्ये कोणताही जातीभेद न ठेवता सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणे हीच खरी लोकशाही आहे,” अशा भावना यावेळी सुरवसे यांनी व्यक्त केल्या. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारधारेवर चालत, हंगरगा नळ गावाला एकजुटीने आणि प्रेमाने विकासाच्या वाटेवर नेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
गावात कौतुकाचा वर्षाव: मत मागण्यापूर्वी जनतेचा आणि त्यांच्या श्रद्धेचा सन्मान राखण्याच्या या पद्धतीमुळे हंगरगा नळ गावात गोपाळ सुरवसे यांच्या संयमी नेतृत्वाची चर्चा रंगली आहे. “आपल्या गावाला एकजुटीने आणि सर्वधर्म एक या पद्धतीने कायमच ठेवू,” अशी ग्वाही त्यांनी देताच उपस्थितांनी त्यांचे स्वागत केले.