‘अधिकार वार्ता’ विशेष: “विरोधकांनी खोके ओतून सत्ता मिळवली, आता लाट बदलणार!” – खा. ओमराजे निंबाळकरांचा काक्रंब्यात घणाघात

Pranesh

हा भ्रष्टाचाराचा गड उध्वस्त करण्यासाठीच मी माझे निष्ठावान शिलेदार तुमच्या हवाली केले आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

काक्रंबा (प्रतिनिधी): काक्रंबा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीने आता उच्चांक गाठला आहे. जिल्हा परिषद उमेदवार ॲड. रामचंद्र ढवळे आणि पंचायत समिती उमेदवार उमेश पंडागळे यांच्या प्रचारासाठी धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांची तोफ आज काक्रंब्यात धडाडली. यावेळी ओमराजेंनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेत, त्यांच्या ‘पैशाच्या राजकारणावर’ सडकून टीका केली.

पैशाच्या जोरावर सत्ता, पण विकास शून्य! सभेला संबोधित करताना खासदार ओमराजे म्हणाले की, “विरोधकांनी नगरपरिषदा आणि महानगरपालिका केवळ पैशाच्या जोरावर निवडून आणल्या आहेत. मात्र, सामान्यांच्या प्रश्नांशी त्यांना काहीही देणंघेणं नाही.” तुळजापूरच्या आमदारांवर निशाणा साधताना ते म्हणाले, “गेल्या पाच वर्षांत तुळजापूर तालुक्यासाठी ५००० कोटी रुपये मंजूर केल्याचा गवगवा केला जातोय, पण हे कोट्यवधी रुपये नेमके गेले कुठे? कागदावरचा हा विकास जमिनीवर शोधूनही सापडत नाही, हे दुर्दैव आहे.”

भ्रष्टाचाराचा पंचनामा: ‘काक्रंबा’च्या दुर्दशेला जबाबदार कोण?काक्रंबा गटातील भीषण वास्तव मांडताना खासदारांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. “खराब रस्ते, पिण्याचं घाण पाणी आणि पडक्या शाळा… हेच का तुमचं विकासाचं मॉडेल?” असा सवाल करत त्यांनी या सर्व कामांत भ्रष्टाचार झाल्याचा थेट आरोप केला. हा भ्रष्टाचाराचा गड उध्वस्त करण्यासाठीच मी माझे निष्ठावान शिलेदार तुमच्या हवाली केले आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मशालीच्या बटणाने भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणणार! “मतदारांना आवाहन करताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की, काक्रंबा गटाचा आणि गणाचा १००% कायापालट करण्यासाठी ॲड. रामचंद्र ढवळे आणि उमेश पंडागळे यांना ताकद द्या. भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी ‘धगधगत्या मशाली’समोरील बटण दाबून आपल्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा.

या सभेने काक्रंबा परिसरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असून, ओमराजेंच्या या ‘टोमण्यांनी’ विरोधकांच्या गोटात चांगलीच अस्वस्थता पसरली आहे.

Leave a Comment