इथं गुन्हेगाराला एन्ट्री नाही! आमचा माणूस, आमचं गाव, आमचा गट, आमचा स्वाभिमान, आमचं मत कचरू सगट.

शहापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): शहापूर जिल्हा परिषद गटात निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी उमेदवारांच्या कार्यपद्धती आणि पार्श्वभूमीवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. या गटात शिवसेना (ठाकरे गट) कडून उमेदवार असलेले कचरू सगट हे आपल्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामुळे जनतेत विशेष चर्चेचा विषय ठरत आहेत.
कचरू सगट हे गेल्या अनेक वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून गोरगरिबांच्या समस्या, पाणी, रस्ते, रोजगार, आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांसाठी झटत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. अडचणीत असलेल्या कुटुंबांच्या मदतीला धावून जाणे, प्रशासनाकडे पाठपुरावा करणे आणि सामान्य माणसाचा आवाज बनणे, हीच त्यांची ओळख असल्याची भावना मतदारांमध्ये दिसून येते.
दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) कडून उभे असलेले उमेदवार सुनील बनसोडे यांच्या उमेदवारीवरून मात्र गावागावात संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांच्या पार्श्वभूमीबाबत प्रश्न उपस्थित केले जात असून, ही बाब सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे. याबाबत विरोधकांकडून टीका होत असली तरी, यावर संबंधितांकडून स्पष्टीकरण अपेक्षित असल्याचेही बोलले जात आहे.
एकीकडे जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करणारा उमेदवार, तर दुसरीकडे पार्श्वभूमीवरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला उमेदवार — अशी ही लढत शहापूर जिल्हा परिषद गटात पाहायला मिळत आहे.
आता मतदार कोणाच्या कार्यावर विश्वास ठेवतात आणि कोणाला संधी देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.