ज्या मतदारसंघाने निवडून दिले, त्या तुळजापूरच्या विकासाकडे पाठ! “स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून”– मतदार

तुळजापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): “स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून” या उक्तीप्रमाणे सध्या तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा कारभार सुरू असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात रंगली आहे. स्वतःला ‘कामाची गॅरंटी’ म्हणवून घेत मोठा बोलबाला करणाऱ्या आमदारांची ही गॅरंटी म्हणजे केवळ ‘शब्दांचे बुडबुडे’ असल्याची बोचरी टीका आता मतदारांकडून केली जात आहे.
स्वतःचा तालुका ‘रामभरोसे’, धाराशिववर मात्र ‘ममत्व’! ज्या मतदारसंघाने निवडून दिले, त्या तुळजापूरच्या विकासाकडे पाठ फिरवून आमदारांचे डोळे सध्या धाराशिवच्या राजकारणावर खिळले आहेत. स्वतःच्या तालुक्यातील रखडलेली कामे झाकून ठेवायची आणि दुसऱ्याच्या चुका उकरून काढण्यात धन्यता मानायची, हाच आमदारांचा सध्याचा एककलमी कार्यक्रम बनला आहे. तालुक्याचा विकास ‘अदृश्य’ झाला असला, तरी सत्तेचे राजकारण मात्र जोरात सुरू आहे.
पंचायत समितीची कमान की आमदारांच्या कर्तृत्वाचा आरसा? ज्या पंचायत समितीच्या नावाने राजकारण चालते, त्या समितीची कमान (छायाचित्रात पहा) गेल्या कित्येक वर्षांपासून साधी रंगरंगोटीही न पाहता उभी आहे. ‘विकासाची पंढरी’ म्हणणाऱ्या आमदारांना ही विद्रुप झालेली कमान दिसत नाही का? की ‘कामाची गॅरंटी’ फक्त फेसबुक, इंस्टाग्राम आणि पोस्टरवरच मर्यादित आहे? कमानीची ही दयनीय अवस्था पाहून जनतेत घृणा निर्माण होत असून, आमदारांच्या कर्तृत्वाचा हा खरा आरसा असल्याचे बोलले जात आहे.

ठणठणीत आमदार, कामाचा मात्र पत्ता नाही! “दुसऱ्यांच्या कामात चुका शोधण्यात पटाईत असलेल्या आमदारांनी आधी आपल्या अंगणातील कचरा साफ करावा, असा टोला विरोधकांनी लगावला आहे. “दुसऱ्याचे डोळे बघण्यापेक्षा आपल्या डोळ्यातील मुसळ बघावे,” अशा शब्दात त्यांची ‘ठणठणीत’ इज्जत काढली जात आहे. सत्तेसाठी हपापलेल्या या राजकारणात तुळजापूरचा सर्वसामान्य माणूस मात्र विकासापासून वंचित राहिला आहे.
पत्नीला ‘सभापती’ करण्यासाठीच सर्व अट्टहास? नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत तेर गटातून त्यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील निवडून आल्या आहेत. आता त्यांना जिल्हा परिषदेचे सभापती करण्यासाठीच आमदारांची सर्व शक्ती पणाला लागली आहे. केवळ सत्ता काबीज करणे आणि स्वतःचे राजकीय वर्चस्व टिकवणे हेच त्यांचे धोरण असून, सामान्यांचा तालुका मात्र ‘रामभरोसे’ सोडला गेला आहे.