दीड वर्षात तीन आगी; तरी २०२१ पासून फायर ऑडिट नाही!

Pranesh

आग लागल्यानंतरही प्रशासनाला जाग कधी येणार? पिंपरी जिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेवर गंभीर सवाल

(अधिकार वार्ता प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड: सांगवी येथील सुमारे ६२ वर्षे जुन्या पिंपरी जिल्हा रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेचा धक्कादायक प्रश्न समोर आला आहे. २०२१ पासून रुग्णालयाचे फायर सेफ्टी ऑडिट झालेले नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, गेल्या दीड वर्षात तीन वेळा आगीच्या घटना घडल्याचे समोर येत असतानाही प्रशासनाने फायर ऑडिट का केले नाही?

सुमारे ३०० खाटांच्या या रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने गरीब, ग्रामीण आणि सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी येतात. नवजात बालके, गंभीर रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी रुग्णालयात असताना अग्निसुरक्षेबाबत एवढी मोठी बेफिकिरी का? एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?

पाच वर्षे फायर ऑडिट नाही, त्यात दीड वर्षात तीन आगी—मग रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा आणि सुरक्षा उपायांची नियमित तपासणी होते तरी कशी? आपत्कालीन मार्ग सुरक्षित आहेत का? आग लागल्यास रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची व्यवस्था सक्षम आहे का?

याशिवाय रुग्णालयातील जागेची कमतरता, अस्वच्छ स्वच्छतागृहे, मूलभूत सुविधांचा अभाव आणि जुन्या इमारतीची स्थिती याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

रुग्णांच्या जीविताची जबाबदारी कोणाची? फायर ऑडिटला पाच वर्षे विलंब का? तीन आगी होऊनही प्रशासनाला गांभीर्य कधी येणार? या प्रश्नांची उत्तरे आता रुग्णालय प्रशासनाने देणे गरजेचे आहे.

Leave a Comment