
तुळजापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): धाराशिव जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. तुळजापूर तालुक्यातील नंदगाव पंचायत समिती गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खंबीर नेतृत्व ज्योती भीम (भाऊ) मोरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात अधिकृतपणे उडी घेतली आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांचे मार्गदर्शन ज्योती मोरे यांनी हा उमेदवारी अर्ज धाराशिव जिल्ह्याचे लाडके खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली दाखल केला आहे. खासदार निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांची गती नंदगाव गणात अधिक जोमाने राबवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचे मोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
जनसेवेचा संकल्प आणि राजकीय भूमिका
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपली भूमिका मांडताना ज्योती मोरे म्हणाले की, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाशी आम्ही प्रामाणिक आहोत. नांदगाव गणातील ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. या गणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
“नंदगाव गणात ज्योती भीम (भाऊ) मोरे यांचा दांडगा जनसंपर्क असून, त्यांच्या उमेदवारीमुळे शिवसेना ठाकरे गटाची बाजू अधिक भक्कम झाली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे तुळजापूर तालुक्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, सर्वसामान्यांचे लक्ष आता या निवडणुकीकडे लागले आहे.