
जळकोट (अधिकार वार्ता प्रतिनिधी): “संसाररुपी गाडीचे एक चाक महिला आहे, तिच्या कष्टाशिवाय घर चालत नाही. त्याचप्रमाणे महिलांच्या वेदना आणि समस्या मांडण्यासाठी सभागृहात एका खंबीर महिला नेतृत्वाचीच गरज असते. जळकोट जिल्हा परिषद गटातील प्रत्येक महिलेचा आवाज म्हणून मी तुमची साथ देण्यासाठी सज्ज आहे,” असा विश्वास प्रतीक्षा गोपाळ सुरवसे यांनी व्यक्त केला. प्रतीक्षा सुरवसे यांनी आज सकाळी रानामध्ये कामाला जाणाऱ्या कष्टकरी महिलांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि जळकोट गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली भूमिका मांडली.
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादया भेटीदरम्यान महिलांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. “आमच्यासारख्या कष्टकऱ्यांच्या समस्या समजून घेणारी व्यक्ती आम्हाला हवी आहे,” असे सांगत तेथील महिलांनी प्रतीक्षा सुरवसे यांना मायेचा आशीर्वाद दिला. कामाला जाणाऱ्या महिलांनी, “तू आमच्या सर्वांचा आवाज हो, या गटाचा १००% विकास कर,” असा शब्द देत त्यांना पाठबळ जाहीर केले.
प्रतिक्षा सुरवसे यांचे प्रमुख मुद्दे:
महिला हा कुटुंबाचा मुख्य आधार असून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
जिल्हा परिषद सभागृहात महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी एका भगिनीची गरज आहे.
जळकोट गटाचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन.
यावेळी भागातील महिला कामगार आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या संवाद दौऱ्यामुळे जळकोट जिल्हा परिषद गटात महिलांच्या राजकीय जाणीवा अधिक प्रबळ होताना दिसत आहेत.