“प्रचाराचा नारळ वाढवला, पण निधनाच्या बातमीने पाय रेंगाळले; सुरवसे यांनी सभा सोडून वाहिली दादांना श्रद्धांजली”

Pranesh

या घटनेमुळे राजकीय मतभेद विसरून माणुसकीचे दर्शन जळकोटमध्ये पाहायला मिळाले.

जळकोट (अधिकार वार्ता प्रतिनिधी): जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आली. या बातमीने राजकीय वातावरण सुन्न झाले असून, जळकोट जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार गोपाळ सत्यवान सुरवसे यांनी आपले सर्व प्रचाराचे कार्यक्रम त्वरित थांबवून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळ सुरवसे हे आपल्या गटातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी दौऱ्यावर होते. गावातील एका मंदिरात ते ग्रामस्थांशी संवाद साधत असताना आणि लोकशाहीत मतदानाचे महत्त्व पटवून देत असतानाच, अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या कानावर आले. ही बातमी ऐकताच सुरवसे यांना मोठा धक्का बसला आणि त्यांच्या तोंडून शब्द फुटेनासे झाले.अशा कठीण प्रसंगी, त्यांचे बंधू आणि उपस्थित समर्थकांनी परिस्थिती सावरून घेत तात्काळ प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला.

“राजकारणापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे असे जाणे क्लेशदायक आहे,” अशा भावना व्यक्त करत सुरवसे यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. यानंतर गावात शोककळा पसरली असून, मंदिरात उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळून लाडक्या नेतृत्वाला श्रद्धांजली वाहिली.

Leave a Comment