तुळजापूरच्या राजकारणात मोठा धमाका! आजच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची मोठी खेळी; वंचित बहुजन आघाडी एकमेकांना दिला जाहीर पाठिंबा!

Pranesh

तुळजापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): तुळजापूर तालुक्याच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर आज आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व ‘वंचित बहुजन आघाडी’ पक्षांनी एकमेकांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला. या एका निर्णयामुळे तालुक्यातील संपूर्ण राजकीय समीकरणे पूर्णपणे विस्कळीत झाली असून, प्रस्थापित विरोधकांमध्ये जबरदस्त भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धैर्यशील पाटलांची रणनीती; विरोधक चक्रावले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना पाटील यांनी स्पष्ट केले की, तालुक्यातील दडपशाही मोडून काढण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी ही ‘तुतारी’ आणि ‘वंचित’ची युती काही ठिकाणी करण्यात आली आहे. या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या पाठिंब्यामुळे निवडणूक आता केवळ औपचारिकता नसून तो एक मोठा राजकीय लढा बनला आहे.

मैदानात उतरलेली महाशक्ती: उमेदवारांची पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या उमेदवारांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला. यामध्ये प्रामुख्याने: जिल्हा परिषद गटात: काक्रंबा गटाचे वंचितचे उमेदवार मिलिंद रोकडे, शहापूर गटाचे तुतारीचे उमेदवार अशोक जाधव, आणि मंगरूळ गटाच्या उमेदवार धनश्री पाटील (तुतारी) यांनी आपली ताकद दाखवून दिली.

पंचायत समिती गणात: मंगरूळ गणातून शानुरबी शेख (तुतारी), आरळीतून खंडू कुंभार (अपक्ष), येवतीतून लिंबराज सुरवसे (तुतारी), काक्रंबा गणातून विकास चंदनशिवे (तुतारी), जळकोटमधून परमेश्वर लोखंडे (VBA), सावरगाव मधून चांद पठाण (VBA) आणि सलगरा गणातून रोहित देवकर (अपक्ष) या सर्वांनी एकत्र येत संघर्षाचे रणशिंग फुंकले आहे.

विजयाचा मार्ग सुकर; विरोधकांचे धाबे दणाणले. या युतीमुळे मतदारांमध्ये एक सकारात्मक संदेश गेला आहे. विशेषतः ग्रामीण भागात शरद पवार यांच्याबद्दल असलेली सहानुभूती आणि वंचित बहुजन आघाडीचा निष्ठावान मतदार एकत्र आल्याने ‘विजयाची गणिते’ आता स्पष्ट होताना दिसत आहेत. दुसरीकडे, या नव्या युतीने विरोधकांच्या गोटात मोठी पडझड सुरू झाली असून, अनेक ठिकाणी रणनीती बदलण्याची वेळ विरोधकांवर आली आहे.

Leave a Comment