ज्यांना वाटले होते की जनता डोळे झाकून मतदान करेल, त्यांना आज कळाले असेल की, जळकोटची माती पीकही देते आणि माज वाढला तर तो जिरवून मातीत मिळवायलाही मागेपुढे पाहत नाही.


जळकोट (अधिकार वार्ता प्रतिनिधी): ज्यांना वाटलं होतं की जळकोटची जिल्हा परिषद म्हणजे आपल्या बापजाद्यांची पेंढ आहे, ज्यांना वाटलं होतं की सत्ता आपल्या खिशातली चावी आहे, अशा माजलेल्या प्रस्थापितांना जळकोटच्या एका तरुण रक्ताने थेट जमिनीची धूळ चाटायला लावली आहे. वर्षानुवर्षे सत्तेची ऊब घेणाऱ्या ‘जुनाट’ वृक्षाला एका साध्या शेतकऱ्याच्या पोराने मुळासकट उपसून फेकून दिले आहे.
अनुभवाचा गर्व आणि जनतेचा हिसका: भाजपचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या पत्नी ज्योती प्रकाश चव्हाण या निवडणुकीत रिंगणात होत्या. “पती माजी सदस्य, स्वतःचा जुना अनुभव आणि हातात असलेली सत्ता” या जोरावर चव्हाण घराण्याने ही निवडणूक खिशात असल्याचे भासवले होते. मात्र, जळकोटच्या जनतेच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. ज्यांना वाटत होतं की आपली सत्ता म्हणजे आमचा ‘सातबारा’ आहे, त्यांना एका सामान्य शेतकरी कन्येने असा काही ‘करेक्ट कार्यक्रम’ केला की, आता त्यांना पराभवाचे चटके सहन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
प्रतिक्षा सुरवसे नावाचं वादळ! काँग्रेसची तरुण उमेदवारी प्रतिक्षा गोपाळ सुरवसे हिने प्रस्थापितांच्या गडाला असा सुरुंग लावला की, बड्या-बड्या धुरधरांना आता तोंड लपवायची जागा उरलेली नाही. एका तरुण पोराने वर्षानुवर्षे पाय रोवून बसलेल्या ‘अनुभवी’ राजकारण्याला असा धोबीपछाड दिला की, त्याचे पडसाद आता जिल्ह्यापर्यंत उमटणार आहेत. ज्यांना वाटत होतं की पैशाच्या आणि अनुभवाच्या जोरावर आपण पुन्हा एकदा सत्तेचा मलिदा खाऊ, त्यांना एका तरुण शेतकरी कन्येने थेट मातीची चव दाखवून दिली.
जळकोटमध्ये आता पारापारावर एकच चर्चा आहे – “ज्यांनी जळकोटला आपली जहागिरी समजली, त्यांना एका पोराने आज जमिनीवर आणले!” ज्यांना वाटले होते की जनता डोळे झाकून मतदान करेल, त्यांना आज कळाले असेल की, जळकोटची माती पीकही देते आणि माज वाढला तर तो जिरवून मातीत मिळवायलाही मागेपुढे पाहत नाही. अनुभवाची फुशारकी मारणाऱ्यांना एका नवख्या तरुण रक्ताने अशी काही धूळ चारली आहे की, आता आगामी अनेक वर्षे त्यांना या पराभवाचे शल्य टोचत राहील.
आता तरी शुद्धीवर या! जळकोटच्या जनतेने हे सिद्ध केलंय की, सत्ता कोणाची ‘खाजगी मालमत्ता’ नसते. तुम्ही कितीही वर्ष सत्तेत राहा, पण जर लोकांची कामं करण्याऐवजी स्वतःची मुळं घट्ट करण्यातच मग्न असाल, तर जनता तुम्हाला मुळासकट उपसून फेकायला वेळ लावत नाही.