दिघीतील सार्वजनिक स्वच्छतागृहे की ‘नरकद्वार’? निवडून आलेले प्रतिनिधी एसीत, तर जनता दुर्गंधीच्या विळख्यात!

Pranesh

दिघी (अधिकार वार्ता प्रतिनिधी): पंतप्रधानांनी दिलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या वल्गना आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मिरवलेले ‘स्मार्ट सिटी’चे बिरुद दिघीमध्ये पूर्णपणे धुळीला मिळाल्याचे वास्तव समोर आले आहे. दिघी परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था इतकी भयानक झाली आहे की, या ठिकाणाहून चालणेही नागरिकांना असह्य झाले आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मोठ्या आणाभाका घेऊन निवडून आलेले लोकप्रतिनिधी आता गायब झाले असून, जनतेला घाणीच्या साम्राज्यात सोडून देण्यात आले आहे.

प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा ‘बोगस’ कारभार: मिळालेल्या माहितीनुसार, दिघीतील अनेक स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छतेचा मागमूसही उरलेला नाही. आत गेल्यास बघवत नाही इतकी घाण साचलेली आहे. ही ठिकाणे रोगराईची केंद्रे बनली असून, इथल्या अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाचे अधिकारी ‘कुंभकर्णी’ झोपेत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

‘पाणी’ नावाचा प्रकारच नाही! केवळ नावापुरती शौचालये उभी करून प्रशासनाने हात झटकले आहेत. बाथरूममध्ये पाण्याची कोणतीही सोय नाही. स्वच्छतेसाठी लागणारे साधे पाणी उपलब्ध नसल्यामुळे परिस्थिती अधिकच हाताबाहेर गेली आहे. बाहेरून पाहताना पाण्याचे हौद बांधलेले दिसतात, परंतु हे हौद केवळ पांढरा हत्ती ठरत आहेत. त्यात एकदम घाण पाण्याचा साठा असून, पाण्याच्या टाक्या बसवण्याचे साधे कर्तव्यही प्रशासनाला पार पाडता आलेले नाही.

“लाज वाटू द्या!” निवडणुकीच्या काळात गल्लीबोळात फिरणारे आणि मतदारांचे पाय धरणारे उमेदवार आता नक्की कुठे आहेत? असा प्रश्न जनता विचारत आहे. “मते मागताना आम्ही चालतो, मग आता आमच्या आरोग्याचा प्रश्न सोडवताना हे नेते कुठे लपून बसले आहेत?” असा संताप महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आहे. निवडून आलेल्या प्रतिनिधींना जनतेच्या या मूलभूत समस्यांकडे बघायला वेळ नसेल, तर त्यांना ‘लोकप्रतिनिधी’ म्हणायची तरी कशी, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.

Leave a Comment