गौरवच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर चाकूचे वार केल्याचे स्पष्ट दिसत होते. इतकेच नाही तर त्याच्या तोंडातून रक्तही येत होते. जर ही आत्महत्या असती तर शरीरावर चाकूचे वार कसे?

तुळजापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): तुळजापूर तालुक्यात एका हृदयद्रावक आणि तितक्याच संशयास्पद घटनेने खळबळ उडाली आहे. सिंदगाव येथील ‘गौरव लक्ष्मण इंगोले’ या तरुण मुलाचा मृतदेह मंगळवारी (२४ फेब्रुवारी) संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार आत्महत्या नसून गौरवचा घातपात करण्यात आला आहे, असा गंभीर आरोप सिंदगावच्या गावकऱ्यांनी केला असून संशयाची सुई गौरवच्याच मित्रांकडे वळवली आहे.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, गौरव इंगोले हा मंगरूळ येथील एका कारखान्यावर कामाला होता. मंगळवारी दुपारी ४ ते ५ च्या सुमारास कारखान्या जवळचे गाव येवती या गावाच्या शिवारात गौरवचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना समजताच परिसरात मोठी गर्दी जमली. मात्र, गौरवचा मृतदेह खाली उतरवल्यानंतर जे वास्तव समोर आले, त्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.
शरीरावरील जखमांनी संशय बळावला. गौरवने आत्महत्या केल्याचे वरकरणी भासत असले तरी, त्याच्या शरीरावरील खुणा काही वेगळीच कहाणी सांगत आहेत. मृतदेह तपासला असता गौरवच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर चाकूचे वार केल्याचे स्पष्ट दिसत होते. इतकेच नाही तर त्याच्या तोंडातून रक्तही येत होते. जर ही आत्महत्या असती तर शरीरावर चाकूचे वार कसे? असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून विचारला जात आहे.
मित्रांनीच केला घात? गावकऱ्यांचा आरोप. या घटनेनंतर सिंदगावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गौरवच्या सोबत असलेल्या मित्रांनीच त्याचा घात केला असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. “हा आत्महत्येचा प्रकार नसून निर्घृण हत्याच आहे, गौरवच्या अंगावरील जखमा ओरडून सांगत आहेत की त्याचा खून झाला आहे,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. गौरवचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात घातपाताचा अँगल लक्षात घेऊन पोलीस गौरवच्या मित्रांची आणि संपर्कातील व्यक्तींची चौकशी करत आहेत.
आता पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होते आणि गौरवच्या मृत्यूचे गूढ उकलते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.