विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे अन्याय करणाऱ्या प्रिन्सिपलमुळे रॉयल एज्युकेशन सोसायटीची प्रतिमा मलिन होत नाही का?




लातूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): शिक्षणाचे माहेरघर असलेल्या लातूरमधील COCSIT कॉलेजमध्ये सध्या प्रिन्सिपलच्या ‘विचित्र’ शिस्तीचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. ५० किलोमीटर अंतरावरून कॉलेजच्या कामासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याला केवळ ‘युनिफॉर्म’ नाही म्हणून सही नाकारण्यात आली. “आधी गावी जा, कपडे बदलून या, मगच सही देतो,” अशी ताठर भूमिका घेणाऱ्या प्रिन्सिपलना कॉलेजच्या मुख्य गेटवरील ‘बेशिस्त’ मात्र दिसत नसल्याचे समोर आले आहे.
कुठे गेली तुमची ‘रॉयल’ शिस्त? रॉयल एज्युकेशन सोसायटीच्या नावाखाली चालणाऱ्या या कॉलेजमध्ये शिस्तीचे मापदंड फक्त गरिबांच्या मुलांसाठीच आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रिन्सिपलच्या शिस्तीचा बुरखा फाडणारे काही धक्कादायक वास्तव खालीलप्रमाणे आहे:
गेटवरचा राडा: कॉलेजच्या मुख्य गेटवरच चारचाकी गाड्या उभ्या असतात. ही कोणती शिस्त आहे? जर गेटसमोर बेशिस्त पार्किंग चालते, तर विद्यार्थ्याने युनिफॉर्म नाही घातला तर आकाश कोसळते का?
तुटलेले, फाटलेले नाव आणि झाडांचे अतिक्रमण: कॉलेजच्या मुख्य गेटवर संस्थेच्या नावाचे LED बोर्ड तुटलेले आहेत, बॅनर फाटलेले आहेत आणि नावावर झाडांनी अतिक्रमण केले आहे. स्वतःच्या कॉलेजचे नाव नीट ठेवता येत नाही, ते प्रिन्सिपल विद्यार्थ्यांना शिस्त काय शिकवणार?

वॉशरूममध्ये अस्वच्छतेचा ‘कळस’: ज्या ठिकाणी शिस्त सर्वात जास्त हवी, त्या ‘बॉईज वॉशरूम’मध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. तिथे दुर्गंधी हटवण्यासाठी प्रिन्सिपल ‘स्ट्रिक्ट’ का होत नाहीत? की तिथे गेल्यावर त्यांचे शिस्तीचे नियम लागू होत नाहीत?
प्रिन्सिपल साहेब, खुर्चीवर बसून माणुसकी विसरलात का? एखाद्या विद्यार्थ्याला १०० किमी (येणे-जाणे) प्रवास करायला लावणे हे केवळ नियमांचे पालन नसून अधिकाराचा गैरवापर आहे. विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा याला किंमत न देणारे प्रशासन विद्यार्थ्यांचे भविष्य काय घडवणार? संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन, केवळ बाह्य शिस्तीपेक्षा कॉलेजच्या अंतर्गत सुविधा आणि व्यवस्थापनातील त्रुटींकडे लक्ष देण्याची गरज आहे.


संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सवाल: विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे अन्याय करणाऱ्या प्रिन्सिपलमुळे रॉयल एज्युकेशन सोसायटीची प्रतिमा मलिन होत नाही का? शिस्त ही सर्वांना समान असावी, फक्त विद्यार्थ्यांच्या कपड्यांवरून ती ठरवली जाऊ नये.