निगडीत गॅससाठी ‘महाभारत’! रांगेत उभं राहून जनतेचा संयम सुटला; सरकारवर टीकेची तोफ, हॉटेल व्यवसायाचे कंबरडे मोडले!

Pranesh

“मोठमोठ्या जाहिराती करणाऱ्या सरकारने सर्वसामान्यांच्या चुलीकडे लक्ष द्यावे”

पुणे/निगडी (अधिकार वार्ता प्रतिनिधी): एकीकडे देश महासत्तेची स्वप्ने पाहत असताना, दुसरीकडे पिंपरी-चिंचवडसारख्या बलाढ्य शहरात नागरिकांना एका गॅस सिलेंडरसाठी सकाळपासून रस्त्यावर रांगा लावाव्या लागत आहेत. निगडी परिसरात आज गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “कामधंदा सोडून रस्त्यावर उभं राहायचं का?” असा संतप्त सवाल विचारत जनतेने थेट मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना धारेवर धरले आहे.

अर्ध्या रस्त्यापर्यंत रांगा, जनजीवन विस्कळीत! आज सकाळपासूनच निगडीमध्ये गॅस एजन्सीबाहेर किलोमिटरभर लांब रांगा पाहायला मिळाल्या. कोणी कामावर सुट्टी घेऊन आले आहे, तर कोणी आपले छोटे दुकान बंद करून रांगेत उभे आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे निगडीतील जनजीवन पूर्णपणे कोलमडले असून, नागरिक भर उन्हात सिलेंडर मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.

हॉटेल व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ. गॅस पुरवठा खंडित झाल्याचा मोठा फटका स्थानिक हॉटेल आणि खानावळींना बसला आहे. अनेक हॉटेल्स आज गॅसअभावी बंद ठेवण्याची वेळ आली आहे. “जर गॅसच मिळाला नाही, तर आम्ही ग्राहकांना काय खायला देणार आणि आमचे पोट कसे भरणार?” असा टाहो हॉटेल मालकांनी फोडला आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

“सरकारच्या निष्काळजीपणामुळे गाव गाठण्याची वेळ” रांगेत उभ्या असलेल्या एका कष्टकरी नागरिकाने आपला संताप व्यक्त करताना म्हटले, “आम्ही गावाहून इथे पोटासाठी आलो, पण इथल्या सरकारी अनास्थेमुळे आमचे जगणे मुश्किल झाले आहे. शहरात जर ही अवस्था असेल, तर पुन्हा गावाकडे जाऊन चुलीवर लाकडे जाळून जेवण बनवलेले बरे! गॅस नसल्यामुळे आमची कामे बंद पडायची वेळ आली आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना जाब! या भीषण परिस्थितीला सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे म्हणत नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “मोठमोठ्या जाहिराती करणाऱ्या सरकारने सर्वसामान्यांच्या चुलीकडे लक्ष द्यावे,” अशा शब्दांत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. या नुकसानीची जबाबदारी सरकार घेणार का? असा खडा सवाल आता विचारला जात आहे.

सरकारने या गंभीर समस्येवर तात्काळ तोडगा न काढल्यास, निगडीतील नागरिक आक्रमक पावित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.

Leave a Comment