नळदुर्ग पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी सूर्यवंशी कुटुंबाच्या खिशात आहेत की काय? एका मूकबधिराला मोठमोठ्या लाकडाने बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात…



नळदुर्ग/धाराशिव (अधिकार वार्ता प्रतिनिधी): रक्षणकर्तेच जेव्हा भक्षकांना साथ देऊ लागतात, तेव्हा सामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा? कुन्सावळी–बोळेगाव (ता. तुळजापूर) येथील एका अनाथ मूकबधिर तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्या प्रकरणात नळदुर्ग पोलीस ठाण्याने घेतलेली भूमिका सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहे. आरोपींच्या दहशतीपुढे झुकलेल्या की अर्थपूर्ण संबंधांमुळे गप्प बसलेल्या पोलिसांनी चक्क ‘एफआयआर’ (FIR) न नोंदवता साधी ‘एनसी’ (NCR) नोंदवून गुन्हेगारांचे लाड पुरवल्याचा गंभीर आरोप होत आहे.
काय आहे नेमके प्रकरण? शिक्षक आणि सैनिकाचा मूकबधिरावर अत्याचार! पीडित भूषण सुरवसे याच्या शेतात त्याचे चुलते मधुकर सूर्यवंशी हे बेकायदेशीरपणे ट्रॅक्टर चालवून ताबा मारण्याचा प्रयत्न करत होते. भूषणने याला विरोध केला असता, मधुकर सूर्यवंशी यांनी त्याला शेतातच शिवीगाळ व धक्काबुक्की केली. हा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी मधुकर सूर्यवंशी यांची दोन्ही मुले (दि. २९ मार्च २०२६) सकाळी ७–८ च्या सुमारास, दोन्ही मुले_सतीश मधुकर सूर्यवंशी (पेश्याने शिक्षक) आणि योगेश मधुकर सूर्यवंशी (भारतीय सैन्यात कार्यरत)—यांनी भूषणच्या घरात घुसून हैदोस घातला.
एका मूकबधिराला मोठमोठ्या लाकडाने बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतकेच नाही, तर मध्ये पडणाऱ्या त्याच्या वृद्ध आजीलाही या नराधमांनी सोडले नाही. समाजाला दिशा देणारा ‘शिक्षक’ आणि देशाचे रक्षण करणारा ‘जवान’ एका मूकबधिराचे रक्त सांडताना मागे-पुढे पाहत नाहीत, ही मानवतेसाठी शरमेची बाब आहे.


नळदुर्ग पोलीस ठाणे की आरोपींचे ‘सेफ हाऊस’? इतकी भीषण घटना घडूनही नळदुर्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी एनसी (NCR) दाखल करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींवर आधीच गुन्हे दाखल असतानाही पोलीस त्यांना का वाचवत आहेत? नळदुर्ग पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी सूर्यवंशी कुटुंबाच्या खिशात आहेत की काय? आरोपींच्या दहशतीपुढे झुकलेल्या की अर्थपूर्ण संबंधांमुळे गप्प बसलेल्या पोलिसांनी चक्क ‘एफआयआर’ (FIR) न नोंदवता साधी ‘एनसी’ (NCR) नोंदवून गुन्हेगारांचे लाड पुरवल्याचा गंभीर आरोप होत आहे. अशा निष्क्रीय आणि पक्षपाती पोलीस प्रशासनामुळेच नळदुर्ग पोलीस ठाण्याची बदनामी होत असून सामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडाला आहे.
पीडिताला न्याय मिळणार का? ज्या तरुणाला वाचा नाही, ज्याचे आई-वडील हयात नाहीत, अशा अनाथ मूकबधिर व्यक्तीवर ‘सुशिक्षित’ आणि ‘वर्दी’ असलेल्या व्यक्तींनी हल्ला करणे हा मानवतेचा खून आहे. या प्रकरणाची दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने घेऊन दोषींवर ‘कलम १०९’ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.