





सोलापूर (अधिकार वार्ता प्रतिनिधी): देशाची ‘भिम नगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी झाली. यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे तंत्रज्ञान आणि विचारांचा संगम असलेला ‘AI आंबेडकर: व्हिजन बियॉन्ड टाइम’ हा डिजिटल देखावा. बाबासाहेबांचे विचार केवळ कालचे नव्हते, तर ते भविष्यातील प्रगत जगाचाही आधार आहेत, हा संदेश यातून देण्यात आला.
विज्ञानाशी जोडलेली विचारधारा. या सोहळ्यात बाबासाहेबांच्या ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’वर विशेष भर देण्यात आला. आजच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) युगातही त्यांचे विचार कसे दिशादर्शक ठरू शकतात, याचे प्रभावी दर्शन चित्ररथातून घडले. धरणे आणि वीज निर्मिती (Dam & Electricity) क्षेत्रातील बाबासाहेबांचे योगदान आजही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधोरेखित करण्यात आले.
किती शोभला असता भिम नोटावर… ‘मिरवणुकीत उमटलेला “किती शोभला असता भिम नोटावर, टाय आणि कोटावर..!” हा सूर उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेणारा ठरला. ज्या महापुरुषाने भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) संकल्पना मांडली आणि देशाची अर्थव्यवस्था उभी केली, त्यांचा सन्मान भारतीय चलनी नोटांवर व्हावा, ही भावना यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रकर्षाने मांडण्यात आली.
सत्याग्रह ते स्त्री शिक्षण: क्रांतीचा प्रवास. चवदार तळे सत्याग्रहाची आठवण करून देणारा देखावा म्हणजे केवळ पाण्यासाठीचा लढा नव्हता, तर तो ‘माणूस’ म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारा आत्मसन्मानाचा लढा होता, हे प्रकर्षाने जाणवले. यासोबतच, आज विविध क्षेत्रांत आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिलांच्या उपस्थितीने ‘स्त्री शिक्षणाचे फळ’ किती गोड आहे, हे सिद्ध केले. डॉक्टर, इंजिनिअर आणि वकील असलेल्या लेकींनी बाबासाहेबांच्या उपकारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
अज्ञानाकडून प्रकाशाकडे! मिरवणुकीत बाबासाहेबांच्या आकृतीभोवती असलेला सूर्यप्रकाश हा ‘अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे’ जाण्याचे प्रतीक ठरला. समाजातील सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रांतील लोक ज्या उत्साहाने बाबासाहेबांच्या विचारांच्या दिशेने चालत होते, त्यावरून हे स्पष्ट झाले की भीमरायांचे विचार केवळ एका वर्गासाठी नसून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहेत.सोलापूरच्या या
सोलापूरच्या या जागतिक भीम जयंतीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, बाबासाहेबांचे विचार हे काळाच्याही पुढे आहेत.यासारख्या अनेक संदेश देणारे देखावे बाबासाहेबांच्या भीमसैनिकाकडून या भीम जयंतीला जगप्रसिद्ध करण्यात यशस्वी कायमस्वरूपी ठरत आहेत.