जळकोट गटात निवडणुकीचा धुरळा, पण जनतेच्या मनात ‘ब्रह्म’! विकासाचा ध्यास की केवळ स्वतःचा ‘खास’ विकास? उमेदवारांनो, उत्तर द्या!

Pranesh

69415

धाराशिव (अधिकार वार्ता प्रतिनिधी): जळकोट गटात सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. गल्लीबोळांत प्रचाराच्या सभा, गाठीभेटी आणि आश्वासनांची खैरात सुरू झाली आहे. मात्र, या सर्व गदारोळात जळकोटची सुज्ञ जनता मोठ्या पेचात पडली आहे. बाहेरून हसतमुख दिसणाऱ्या उमेदवारांना पाहून गावकरी विचारत आहेत – “हे मतदान नक्की करायचं कुणाला? आणि कशासाठी?”

पक्षांतराचा खेळ आणि निष्ठेचा लिलाव जळकोट गटातील राजकीय समीकरणे रोज बदलत आहेत. काल एका पक्षात असणारे नेते आज सत्तेच्या उबबसाठी दुसऱ्या पक्षात डेरेदाखल होताना दिसत आहेत. तत्त्व, निष्ठा आणि विचारधारा या शब्दांचा जणू लिलावच मांडला गेला आहे. “पक्षी बदलले तरी नशीब बदलेल का?” हा प्रश्न सामान्य माणसाला सतावतोय. सत्तेसाठी सोयीनुसार पक्ष बदलणाऱ्या या नेत्यांना खरोखरच गावाच्या विकासाची चाड आहे की, केवळ आपली खुर्ची शाबूत राखण्यासाठी ही धडपड सुरू आहे?

गावाचा विकास की वैयक्तिक तिजोरी? जळकोट गटातील अनेक गावांत रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न आजही ‘जैसे थे’ आहेत. मात्र, निवडणुकीच्या काळात कोट्यवधींच्या निधीच्या गप्पा मारल्या जात आहेत. जनतेच्या मनात आता शंकेची पाल चुकचुकत आहे – हे उमेदवार गटाच्या विकासासाठी निवडणूक लढवत आहेत की, येणाऱ्या पाच वर्षांत स्वतःचा ‘खिसा’ भरण्याचे नियोजन करत आहेत? जनतेला आता पोकळ आश्वासने नको, तर कृती हवी आहे.

१. गेल्या पाच वर्षांत सामान्य माणसाच्या आयुष्यात काय बदल झाला?

२. पक्षांतर करताना तुम्ही मतदारांना विचारले होते का?

३. गावाच्या मूलभूत प्रश्नांवर तुमच्याकडे ठोस ‘ब्लूप्रिंट’ आहे की फक्त भाषणांची आतषबाजी?

४. सत्तेची ऊब मिळाल्यावर तुम्ही पुन्हा जनतेला ओळखणार का?

जनतेचा ‘सायलेंट’ पवित्रा जळकोट गटातील मतदार यावेळी कमालीचा शांत आहे. ही शांतता कोणत्याही वादळापूर्वीची नांदी असू शकते. “आम्ही तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही,” असा जणू मूक संदेशच जनता देत आहे. मतदानाच्या दिवशी जनता कोणाला कौल देते आणि कोणाला घरचा रस्ता दाखवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

अधिकार वार्ताचा परखड सवाल: उमेदवारांनो, लक्षात ठेवा… जनता आता ‘ब्रह्मात’ असली तरी ‘भ्रमात’ नाही. तुमच्या सत्तेच्या खेळात गावाचा बळी दिला जात असेल, तर मतपेटीतून त्याचे उत्तर नक्कीच मिळेल. जळकोटची जनता आता जागी झाली आहे, तुम्ही तयार आहात का?

Leave a Comment