
नांदगाव ( अधिकार वार्ता प्रतिनिधी): नांदगाव गटाच्या राजकारणात सध्या जो काही ‘तमाशा’ सुरू आहे, तो पाहून सुज्ञ मतदारांच्या मनात एकच सवाल येतोय – “अरे, हे नेत्यांचं चाललंय तरी काय?” सत्तेसाठी लाचारी पत्करणारे आणि खुर्चीच्या उबेसाठी पक्षांतराच्या उड्या मारणारे नेते आज विकासाच्या गप्पा मारतायत, पण प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेच्या वाट्याला फक्त उपेक्षाच आली आहे.
लोकांच्या सुखादुःखाशी देणं-घेणं उरलंय का? निवडणुकी पुरते हात जोडणारे हे नेते निवडून आल्यावर जनतेला विसरतात. आज लोकांच्या घरात सुख आहे की दुःख, हे पाहायला कोणाकडे वेळ नाही. ज्या मतदारांच्या जिवावर तुम्ही सत्तेच्या पायऱ्या चढता, त्याच मतदारांच्या घराची कौलं गळतायत, त्यांचं घर कसं चाललंय, याचा विचार कधी केलाय का?
शिक्षणाचा बोजवारा आणि रोजगाराचा वनवास! नांदगावच्या लेकरांच्या शिक्षणाचं काय? मोठ्या शहरात जाण्यासाठी पैसा नाही आणि गावात दर्जेदार सोयी नाहीत. तरुण पोरं पदव्या हातात घेऊन रोजगारासाठी वणवण फिरत आहेत. सत्तेसाठी दिल्ली-मुंबईच्या वाऱ्या करणाऱ्या नेत्यांना इथल्या तरुणांच्या हाताला काम देण्याची साधी सुबुद्धी का सुचत नाही? केवळ आश्वासनांचे गाजर दाखवून तरुणांच्या आयुष्याचा खेळ मांडला जात आहे.
मतदार म्हणजे काय गुलाम वाटले की काय? सर्वात संतापजनक बाब म्हणजे येथील वडार समाजाला दिली जाणारी वागणूक. निवडणुकीत मत मागताना ‘मायबाप’ म्हणायचे आणि सत्ता मिळाली की त्यांना ‘खालचा दर्जा देऊन बोलायचं’, हातात हात द्यायला दहा वेळा विचार करायचा असं तुच्छ वागवायचं, हे आता थांबलं पाहिजे. सामान्य माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्याला सन्मान द्यायला शिका, नाहीतर हाच मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.
अधिकार वार्ताचा परखड सवाल: नेत्यांनो, सत्तेची लाचारी सोडा आणि गावाच्या विकासाचा विचार करा. लोकांच्या प्रश्नांवर बोला, त्यांच्या रोजगारावर बोला आणि गरिबांच्या पोरांच्या शिक्षणासाठी काहीतरी ठोस करून दाखवा. जनतेचा संयम सुटण्याआधी सुधरा, कारण आता जनता फक्त ‘बघ्या’ची भूमिका घेणार नाही, तर जाब विचारणार आहे!