
जळकोट (अधिकार वार्ता प्रतिनिधी): तुळजापूर तालुक्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या ‘जळकोट जिल्हा परिषद गटात’ सध्या थंडीच्या दिवसातही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या गटात आता ‘निष्ठा विरुद्ध सत्ता’ आणि ‘अनुभव विरुद्ध सुरुवात’ असा विचित्र पेच निर्माण झाला आहे. एकीकडे मोठ्या नेत्याने पक्षांतर करून आपले राजकीय व गटाचे वजन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे मुर्टा गावच्या सरपंचांनी आपल्या विकासकामांच्या जोरावर उभाठा मधून काँग्रेसचा गड राखण्याचे आव्हान पेलले आहे. मात्र, या दोन शक्तींच्या लढाईत जळकोटची जनता कोणाचे ‘पानिपत’ करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेत्यांची सोय, कार्यकर्त्यांची डोकेदुखी! जुन्या नेत्यांनी जेव्हा पक्षांतर केले, तेव्हा काही कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. नेत्याने स्वतःच्या भविष्याचा विचार केला की जनतेचा? असा प्रश्न आता चौकाचौकात विचारला जात आहे. “नेता मोठा की विचार मोठा?” या वादात अडकलेल्या जळकोट गटात आता नेत्याच्या जुन्या ताकदीची कसोटी लागणार आहे. पक्षांतर करूनही आपली पकड मजबूत असल्याचा दावा नेते करत असले, तरी मतदारांच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच शिजत असल्याची चर्चा आहे.
मुर्टा गावाच्या सरपंचांची ‘कामे’ आणि भविष्यातील स्वप्ने दुसरीकडे, मुर्टा गावाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या सरपंचांनी थेट जिल्हा परिषदेच्या मैदानात उडी घेतली आहे. हे देखील पक्षांतर केलेले नेते आहेत. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी काँग्रेसचा तिरंगा फडकवण्याची तयारी केली आहे. मात्र, “गावात काम करणे आणि संपूर्ण गट सांभाळणे यात जमीन-आसमानाचा फरक असतो,” असा टोमण त्यांचे विरोधक मारत आहेत. केवळ एका गावातील कामावर पूर्ण गटाची सत्ता मिळणार का? असा खोचक सवालही आता विचारला जात आहे.
“सत्ता कोणाचीही असो, आमची कामे कधी होणार?” जळकोट गटातील जनता मात्र आता या दोन्ही बाजूंना टोमणे मारताना दिसत आहे. “एकाला सत्तेचा मोह सुटेना आणि दुसऱ्याला मोठेपणाची स्वप्ने पडेना,” अशी चर्चा सध्या चहाच्या टपरीवर रंगत आहे. पक्षांतर करणाऱ्या नेत्याला ‘सोयीचे राजकारण’ केल्याबद्दल टोमणे बसत आहेत, तर नव्या चेहऱ्याला ‘अनुभवाच्या कमतरते’वरून लक्ष्य केले जात आहे.
निर्णय जनतेच्या हाती! जळकोटच्या रणसंग्रामात एका बाजूला वर्षानुवर्षांचा राजकीय अनुभव आणि दुसऱ्या बाजूला विकासाचा धडाका लावणारा नवा चेहरा आहे. जनता जुन्या नेत्याच्या ‘ताकदीला’ सलाम ठोकणार की मुर्टा गावच्या सरपंचांच्या ‘कायापालट’ पॅटर्नला स्वीकारणार? आगामी निवडणुकीत मतपेटीतून कोणाला ‘साखर’ मिळणार आणि कोणाला ‘कडू घास’ घ्यावा लागणार, हे लवकरच स्पष्ट होईल.