
जळकोट (अधिकार वार्ता प्रतिनिधी) :राजकारणातील एक धडाडीचे व्यक्तिमत्व आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी धडकताच राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या धक्कादायक बातमीचा मोठा परिणाम जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण यांच्यावर पाहायला मिळाला. आपल्या लाडक्या नेत्याच्या निधनाचे वृत्त समजताच, सुरू असलेला निवडणुकीचा प्रचार अर्ध्यावर सोडून चव्हाण यांना अश्रू अनावर झाले.
प्रचाराचा नारळ फोडला अन् दुर्दैवी बातमी आली. आज सकाळीच प्रकाश चव्हाण यांनी आपल्या पत्नीच्या जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा श्रीगणेशा केला होता. बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आणि विजयाचा निर्धार करून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. कार्यकर्त्यांच्या उत्साहात आणि घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. मात्र, प्रचार रंगात आलेला असतानाच अचानक अजित पवार यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कानावर पडली.
पायाखालची जमीन सरकली बातमी ऐकताच प्रकाश चव्हाण सुन्न झाले. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकल्यागत झाली. कोणाशीही काहीही न बोलता, डोळ्यात साचलेले अश्रू पुसत त्यांनी थेट आपली गाडी गाठली. काही काळ गाडीत बसून राहिल्यानंतर ते बाहेर आले, तेव्हा त्यांचा चेहरा कमालीचा व्याकुळ झाला होता.
‘माझा नेता हरवला’ म्हणत श्रद्धांजली”. माझा नेता हरवला,” अशा शब्दांत रडत्या आवाजात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादांविषयी असलेल्या प्रेमामुळे त्यांना या धक्क्यातून सावरणे कठीण झाले होते. त्यांनी तात्काळ आपल्या पत्नीचा निवडणूक प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला आणि उपस्थित कार्यकर्त्यांसह दोन मिनिटे शांत उभे राहून लाडक्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
या घटनेमुळे परिसरात आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. एका बाजूला निवडणुकीची रणधुमाळी असताना, दुसरीकडे आपल्या नेत्यासाठी प्रचाराचा त्याग करणाऱ्या प्रकाश चव्हाण यांच्या संवेदनशीलतेची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.