शालेय जीवनापासून, बाबासाहेबांच्या नावासाठी रस्त्यावर उतरलेला संघर्षयोद्धा!काक्रंबा जिल्हा परिषद गटात मिलिंद सोमनाथ रोकडे यांचा वंचितचा निर्धार…

Pranesh

85270 1

काक्रंबा (अधिकार वार्ता प्रतिनिधी): ज्या वयात बहुतेक मुलं खेळण्यात, खोड्यांमध्ये आणि निष्पाप बालपणात रमलेली असतात, त्या अवघ्या नऊ वर्षांच्या कोवळ्या वयात औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे यासाठी रस्त्यावर उतरून लढा उभारणारा हा नेता आज पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी कडून संघर्षाच्या रणांगणात उतरला आहे. हा नेता म्हणजे — मिलिंद सोमनाथ रोकडे.

संघर्ष, आंदोलन आणि सामाजिक भान हे शब्द नव्हते, तर त्यांचे बालपण होते. १९९३ पासून विद्यार्थी दशेत असतानाच त्यांच्या अंगात चळवळीचे रक्त भिनले. अन्यायाविरोधात आवाज उठवणे, वंचितांना न्याय मिळवून देणे आणि समाजाला समतेच्या वाटेवर नेणे हा त्यांचा श्वास-प्रश्वास बनला. फक्त बोलघेवड्या घोषणा नाहीत, तर रस्त्यावर उतरून लढणारी कृती हीच त्यांच्या राजकारणाची ओळख राहिली आहे.

शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय, आरक्षणाचा प्रश्न, मागासवर्गीयांचे हक्क, शेतकरी आणि मजुरांचे प्रश्न — प्रत्येक मुद्द्यावर मिलिंद रोकडे यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे. कुठेही सत्तेच्या लालसेपोटी तडजोड नाही, कुठेही विचारांशी गद्दारी नाही. त्यामुळेच ते चळवळीमधून घडलेले, जनतेतून उभे राहिलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

आज काक्रंबा जिल्हा परिषद गटातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून मिलिंद सोमनाथ रोकडे निवडणुकीच्या मैदानात उतरले असून, त्यांच्या प्रवेशाने संपूर्ण राजकीय गणितं कोलमडली आहेत. आतापर्यंत फक्त सत्ता, खुर्ची आणि स्वार्थासाठी पक्षांतर करणाऱ्यांना त्यांनी थेट आरसा दाखवला आहे.

त्यांच्या प्रत्येक भाषणात विरोधकांवर झणझणीत टोमणे असतात, तर प्रत्येक वाक्यात जनतेचा सवाल असतो —“गेल्या वर्षानुवर्षे सत्तेत होतात, मग काक्रंबासाठी काय केलं? रस्ते कुठे गेले? पाणी कुठे आहे? तरुणांच्या हातात नोकऱ्या का नाहीत?”

या थेट प्रश्नांमुळे विरोधकांची बोलती बंद झाली असून, अनेकजण केवळ टीकेपुरते मर्यादित राहिले आहेत. मात्र मिलिंद रोकडे यांनी स्पष्ट केलं आहे की, ही निवडणूक व्यक्तीची नाही, तर विचारांची आहे. ही लढाई खुर्चीसाठी नाही, तर स्वाभिमानासाठी आहे. विकासाचा स्पष्ट अजेंडा, सामाजिक समतेची ठाम भूमिका आणि बाबासाहेबांच्या विचारांची मशाल हातात घेऊन मिलिंद सोमनाथ रोकडे यांनी काक्रंबा जिल्हा परिषद गटात वंचित बहुजन आघाडीचा आवाज अधिक बुलंद केला आहे.

आता काक्रंबामध्ये जनतेसमोर एकच प्रश्न उभा आहे —संघर्षातून घडलेलं प्रामाणिक नेतृत्व निवडायचं, की सत्तेसाठी लाचार झालेलं राजकारण? ही निवडणूक केवळ मतपेटीपर्यंत मर्यादित नसून, समाजाच्या भवितव्याचा निर्णय करणारी लढाई ठरणार आहे!

Leave a Comment